अधिसूचित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करावा -विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे आवाहन *ऑनलाईन समस्या निवारण प्रणाली पोर्टलवर उपलब्ध
महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम-2015
अधिसूचित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करावा
-विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे आवाहन
*ऑनलाईन समस्या निवारण प्रणाली पोर्टलवर उपलब्ध
अमरावती दि. ९ : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अन्वये नागरिकांना शासनाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या विविध अधिसूचित सेवा विहित कालावधीत पारदर्शक, सुलभ व वेळेत उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. यानुषंगाने नागरिकांनी या सेवांचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा ऑनलाईन सेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या "आपले सरकार" या अधिकृत पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
या अधिनियमांतर्गत महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण इत्यादी विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या असून, त्या सेवा ठराविक कालमर्यादेत देणे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा नाकारली गेल्यास किंवा विलंब झाल्यास नागरिकांना अपील करण्याची तरतूदही या अधिनियमात करण्यात आलेली आहे.
शासनाच्या विविध कामकाजाबाबत नागरिकांच्या समस्यांचे प्रभावी व विहीत वेळेमध्ये निवारण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "आपले सरकार" पोर्टलवर ऑनलाईन समस्या निवारण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिक आपल्या समस्या पोर्टलवर नोंदवू शकतात, ज्यावर संबंधित विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना अधिनियमांतर्गत विहित कालावधीत कार्यवाही करून समस्या निकाली काढणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या अधिनियमांतर्गत समस्या निवारणात दिरंगाई झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची सुविधा देखील उपलब्ध असून, यामुळे शासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व उत्तरदायी होण्यास मदत होत आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा तसेच वाशिम या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा