‘पोक्सो’अंतर्गत पिडीतांना सहकार्यासाठी ३५ ‘सपोर्ट पर्सन’ नेमणार अर्ज करण्याचे महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन

 

‘पोक्सो’अंतर्गत पिडीतांना सहकार्यासाठी

 ३५ ‘सपोर्ट पर्सन’ नेमणार

अर्ज करण्याचे महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन

अकोला, दि. १४ : पोक्सो कायद्यान्वये दाखल प्रकरणी न्याय प्रक्रियेदरम्यान बालपिडीतांना सहाय्य व संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यात 35 ‘सपोर्ट पर्सन’ची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.

उमेदवार हा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा बालविकास या विषयातील पदव्युत्तर पदवीधर किंवा बालशिक्षण, बालविकास, बालसंरक्षण या विषयात किमान ३ वर्ष कामाचा अनुभव असलेला पदवीधर असावा. एमएससीआयटी किंवा तत्सम संगणकीय प्रशिक्षण पूर्ण केलेला असावा.

     

बालहक्क किंवा बालसंरक्षणाशी संबंधित काम करणारी कोणतीही संस्था सपोर्ट पर्सन म्हणून कार्य करण्यास पात्र आहे. तसेच, बालगृह किंवा आश्रयगृहाशी अधिकृतरीत्या संबंधित असलेली व्यक्ती देखील त्या मुलाच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळत असल्यास सपोर्ट पर्सन म्हणून अर्ज करू शकते.

 

निवडलेल्या सपोर्ट पर्सनची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाईल. त्याचे दरवर्षी जिल्हा बाल संरक्षण अधिका-यांद्वारे पुनरावलोकन केले जाते आणि आवश्यक असल्यास तीन वर्षांनंतरही कालावधी जिल्हा दंडाधिका-यांच्या मान्यतेने वाढवता येतो.

 

इच्छूकांनी अर्ज १५ दिवसांत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, पहिला माळा, महिला व बालविकास भवन, संतोषी माता देवळाजवळ, रामदासपेठ, अकोला येथे पाठवावेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर मुलाखती घेऊन पात्र व्यक्तींची नियुक्ती करण्यात येईल.

०००

टिप्पण्या