राज्यात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा
राज्यात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम;
मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा
अकोला, दि १४ : भारत निवडणूक
आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण'
(SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून,
राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार
आहे.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने
नुकताच आढावा घेतला. आयोगाच्या निर्देशानुसार प्रशिक्षण, तसेच विहित कार्यक्रमानुसार
नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील 16
लाखांहून अधिक मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी या कार्यक्रमाद्वारे होणार आहे.
बीएलओच्या प्रत्यक्ष
घरांना भेटी
महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात
येणार आहे. यात राज्यातील एकूण ९ कोटी ८६ लक्ष ४४ हजार ४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा
मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (BLO)नियुक्त करण्यात येणार आहे.
हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत
पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले 'बूथ लेव्हल एजंट्स'
(BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.
जनगणनेच्या कामाशी सांगड
सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा
विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील
ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.
महाराष्ट्रासाठीचे महत्त्वाचे वेळापत्रक:
दिनांक २० ते २९ जून २०२६ या
कालावधील बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ३० जून ते २९
जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार
यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती
नोंदविता येतील आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात येईल.
राजकीय पक्षांना आवाहन
भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर
आपले एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे
तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र
मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा