‘ड्रोन’चे विनामूल्य प्रशिक्षण; प्रशिक्षितांना परवाना मिळेल - धनंजय कुलकर्णी

 

 

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी ‘अमृत’ची योजना

‘ड्रोन’चे विनामूल्य प्रशिक्षण; प्रशिक्षितांना परवाना मिळेल

-        धनंजय कुलकर्णी

अकोला, दि. १४ :  अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी ‘ड्रोन’चे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षितांना परवानाही मिळणार असून, इच्छूकांनी ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जात आहे. हा १० दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.

 

ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, विशेषत: ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण, एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात 'डीजीसीए'ची सुरक्षित उड्डाण नियमावली, तसेच आधुनिक ड्रोन हाताळणी, ड्रोनचा मेन्टेनन्स वगैरे बाबींचे प्रशिक्षणही या कोर्समध्ये दिले जाते. कोर्स कालावधीतील १० दिवसांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आणि खर्चही अमृत संस्थाच करते. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्याला ड्रोन विकत घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ घेता येऊ शकेल.

 

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

 

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना थेट वेबसाइटवर अर्ज करावा लागतो. अधिक माहिती आपल्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून मिळू शकते.

उमेदवार लक्ष्यित गटातील असावा आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. अन्य सर्व कागदपत्रांसह वैद्यकीय अधिकाऱ्याकडून फिटनेस दाखला घेणे आवश्यक.

 

या योजनेविषयीची सविस्तर माहिती पुढील लिंकवर उपलब्ध असून, त्या लिंकवरूनच योजनेसाठी अर्ज करता येतो. https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227636

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन