‘एल निनो’बाबत उपाययोजनांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना
‘एल निनो’बाबत उपाययोजनांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा
जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा
- जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. १४ : संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेता अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
संभाव्य ‘एल निनो’बाबत आवश्यक उपाययोजनांविषयी जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. याविषयी बैठकही घेण्यात आली. महापालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, रोहयो उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, पाऊस लांबण्याची आणि दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन, जलसंपदा विभाग, जलयुक्त शिवार २.० प्रकल्प आणि भूजल पुनर्भरण कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. संभाव्य कमी पर्जन्यमान लक्षात घेता जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन व्हावे. गावनिहाय पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यात यावा.
आवश्यक असेल तिथे टँकरचे नियोजन, विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी नियमित तपासण्यात यावी. पशुधनासाठी चारा व पाण्याच्या उपलब्धतेसाठी नियोजनबद्ध प्रयत्न व्हावेत. पाणीपुरवठ्याचे कडक नियोजन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य सेवा, वीज पुरवठा, जलसंधारण तसेच आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा अवलंब करण्याबाबत कृषी विभागामार्फत जनजागृती करावी, तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा प्रचार-प्रसार वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
उष्माघात, दूषित पाणीजन्य आजार व इतर साथींच्या प्रतिबंधासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ग्रामपातळीवर जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यावर भर देण्यात आला. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा