छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; नियोजनभवनात समाधान शिबिर अभियानाद्वारे शेतरस्ते व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवा - खासदार अनुप धोत्रे









छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; नियोजनभवनात समाधान शिबिर

अभियानाद्वारे शेतरस्ते व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवा

-        खासदार अनुप धोत्रे

अकोला, दि. 15 : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’च्या माध्यमातून नागरिकांच्या विविध तक्रारी व अडचणींचे निराकरण, तसेच नागरिकांना आवश्यक सेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे, तसेच इतर प्रलंबित प्रश्नही या माध्यमातून प्राधान्याने सोडवावेत, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे केले.

अकोला व कौलखेड मंडळासाठी नियोजनभवनात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महेश परंडेकर, जोगेंद्र कट्यारे, निखिल खेमनार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भारती खंडेलवाल, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते

खासदार श्री. धोत्रे म्हणाले की, नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे जमिनीशी, तसेच इतर संबंधित प्रश्न एकाच छताखाली व तातडीने निकाली काढणे यासाठी अभियान उपयुक्त आहे. ग्रामीण भागात शेतरस्त्यांच्या तक्रारी बराचकाळ प्रलंबित राहतात. सर्वेक्षण, सीमांकनामुळे या अडचणी दूर व्हायला मदत होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, महाराजस्व अभियानांतर्गत शिबिरांतून नागरिकांना आवश्यक सेवा, दाखल्यांचे वितरण, तसेच तक्रारींचे निराकरण गतीने होत आहे. सातबारा, आठ अ, फेरफार, तसेच विविध १५ हजारहून अधिक दाखल्यांचे वितरण आतापर्यंत झाले आहे.  यापुढेही मोहिम स्तरावर काम करून नागरिकांना सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.

अकोला तालुक्यात मार्चपासून १२ महसूल मंडळ मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होत आहे. नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांचे निराकरण, तक्रारी निकाली काढणे, दाखले वितरण, फेरफार निकाली काढणे, गाव दफ्तर अद्ययावत करणे आदी विविध कामे शिबिराद्वारे पूर्ण होत आहेत.

राजस्व अभियान शिबिरात विविध दाखले, सातबारा, फेरफार आदी दाखले वितरीत करण्यात आले, तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या वितरीत करण्यात आल्या. महसूल विभागासह विविध कार्यालयांचा शिबिरात सहभाग होता. दोन्ही मंडळांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण