जिल्हाधिका-यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
जिल्हाधिका-यांकडून मान्सूनपूर्व
तयारीचा आढावा
मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण
करा
-जिल्हाधिकारी वर्षा मीना
तालुक्यात १ जूनपासून नियंत्रण
कक्ष कार्यान्वित
अकोला, दि. १९ : जिल्ह्यात नालेसफाई,
नादुरुस्त पूल, रस्ते, प्रकल्पांची दुरूस्ती आदी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावी.
धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नोटीसा द्याव्यात. त्याचप्रमाणे, तहसील स्तरावरील, तसेच आरोग्य, नगरपालिका,
महापालिका, साबांवि, पाटबंधारे आदी विभागांचे नियंत्रण कक्ष १ जूनपासून सुरू करावेत,
असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी
बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी
गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व विविध यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या
की, शहरातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक इमारतींबाबत संबंधितांना सूचना
द्यावी. दूषित पाण्यासंदर्भात तपासण्या वाढवा. जिल्ह्यात ५३ महसूल मंडळ स्तरावर रेनगेज
व ॲटोमॅटिक वेदर स्टेशन यंत्रणा कार्यान्वित आहे. या यंत्रणेची तपासणी व आवश्यक तिथे
दुरूस्ती करून घ्यावी.
जिल्ह्यात पूर्णा, मोर्णा, काटेपूर्णा,
पठार, वान, गौतमा, मन, मस, विश्वमित्रा, उमा, पेढी, निर्गुणा, खाईनदी, विद्रुपा नद्या
वाहतात. तसेच, ८३ पूरबाधित गावे आहेत. वारंवार आपत्कालीन घटना झालेली १० ठिकाणे आहेत.
अशा ठिकाणी वेळीच सूचना देण्यासाठी फलक, संदेशवहन यंत्रणा, नियंत्रण कक्ष आदी व्यवस्था
व्हावी. आवश्यक तिथे निवा-यांची सोय, तसेच सर्व प्रकल्पांची दुरूस्ती करावी, बिनतारी
यंत्रणा स्थापित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
त्या पुढे म्हणाल्या की, पावसाळा
लक्षात घेता धोकादायक होर्डिंग्ज, जीर्ण झाडे काढावीत. जिल्हा व तहसील स्तरावरील शोध
व बचाव पथकाचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यांना आवश्यक लाईफ जॅकेट, रिंग, रोप, बोट,
इमर्जन्सी लाईट आदी साहित्य उपलब्ध करून घ्यावे. शहरातील नालेसफाई, नदीनाल्याच्या प्रवाहातील अडथळे
दूर करावेत. पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छता
कामे पूर्ण करावीत, तसेच आरोग्य केंद्रे, पथके सुसज्ज ठेवावीत. महावितरणकडून वीजवाहिन्यांजवळील
धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, खांब कोसळल्यास वेळीच उपाययोजनेसाठी यंत्रणा
आदी कामे पूर्ण करून वीजपुरवठा खंडित होणार नाही
याची दक्षता घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा