मुदतवाढीची ती बातमी खोटी (लाडकी बहिण योजना)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
मुदतवाढीची ती बातमी खोटी
अकोला, दि. २० : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी
करण्याकरिता निश्चित करण्यात आलेली मुदत संपलेली आहे. तथापि, काही माध्यमे व समाजमाध्यमांवर
संबंधित मुदत वाढविण्यात आल्याबाबत काही चुकीच्या व भ्रामक बातम्या प्रसारित होत असल्याचे
निदर्शनास आले आहे.
सदर प्रसारित होत असलेल्या बातम्या या वस्तुस्थितीला धरून नाहीत व त्या
पूर्णपणे अफवा आहेत. अशा प्रकारच्या अप्रमाणित बातम्या तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये
आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन महिला
व बालविकास अधिकारी यांनी केले.
ई-केवायसी करण्याच्या मुदतीत
योग्य ती कागदपत्र सादर करु न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्हयांच्या महिला व बाल
विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याची चुकीची बातमी लाडक्या
बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली एका वृत्तवाहिनीवर व एका वृत्तपत्रात प्रसिध्द
झाली आहे.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" ई-केवायसी करु न शकलेल्या
महिलांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याबाबत आवाहन शासन
स्तरावरुन करण्यात आलेले नाही. चुकीच्या बातम्यांमुळे
योजनेचा लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत असुन त्यामुळे महिला व बाल विकास
अधिकारी कार्यालय शहर व तालुका स्तर कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
सदर वस्तुस्थिती लक्षात घेता अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू
नये व लाभार्थी यांनी संयम ठेवावा असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे
यांनी केले आहे.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा