खरीप हंगामपूर्व आढावा बैठक निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई










 

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा

 पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई

अकोला, दि. १८ : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बी–बियाणे, खते आदी निविष्ठांची कुठेही कमतरता भासू नये यासाठी अचूक नियोजन ठेवा. निविष्ठांचा काळा बाजार कुठेही होता कामा नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिला.  

पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, नितीन देशमुख, साजिदखान पठाण, किरण सरनाईक, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, जिल्ह्यात खते, बियाणे आदी निविष्ठांची कुठेही उणीव भासू नये म्हणून नियोजन सादर करताना योग्य व परिपूर्ण आकडेवारी असावी. निविष्ठांची तालुकानिहाय आवश्यकता व उपलब्धता स्पष्ट असली पाहिजे. तालुका नियोजन करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या पाहिजेत. तशी तयारी करून व मान्यवर लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन अचूक माहिती सादर करावी जेणेकरून राज्यस्तरीय बैठकीत पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात सर्वदूर पुरवठा सुरळीत व्हावा. निविष्ठांचा काळाबाजार, लिंकिंग असे प्रकार झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, कृषी विभागाकडून वेळोवेळी होणा-या कार्यवाहींची माहिती शेतकरी बांधवांना वेळेत झाली पाहिजे. त्यासाठी जिल्हा वॉररूमसारख्या यंत्रणेचा वापर व्हावा. आपत्तीप्रसंगी पंचनामे करताना ते परिपूर्ण होतील व कुणीही आपत्तीग्रस्त वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ‘महावितरण’कडून वितरण रोहित्र (डीपी) संच तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध ठेवावेत जेणेकरून गरज असेल तिथे ते वेळेवर पोचवता येतील व वीजपुरवठा तत्काळ सुरळीत होईल, असे निर्देश त्यांनी दिले. खरीप हंगामासाठी कर्जवितरणाला गती द्यावी. एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले.    

बियाण्यांची उगवण न झाल्यास कंपनीवर तत्काळ कारवाई, शेतक-यांना वेळेत सूचना देणे,  आदी निर्देश देण्यात आले. कार्यक्रमात गुणवंत कृषी अधिका-यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेत ट्रॅक्टर आदी साधनांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. कृषी विभागाच्या सादरीकरणानुसार, खरीप हंगामासाठी ४ लक्ष ३७ हजार १०० हे. प्रस्तावित क्षेत्र आहे. बीटी कापूस बियाणे मागणी प्रती हे. ५ प्रमाणे कापसाचे संभाव्य क्षेत्रफळ १ लक्ष ४५ हजार हे. क्षेत्रफळासाठी ७ लक्ष २५ हजार पाकिटांची मागणी आहे. युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते, एसएसपी आदी खतांचे एकूण मंजूर आवंटन १ लक्ष १४ हजार २०० मे. टन आहे.  

---

अकोला जिल्हा : दृष्टिक्षेप

जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५ लक्ष ४२ हजार ७०० हे.

 

#सर्वसाधारण क्षेत्र

 

*खरीप

४,३१,८८४ हे.

प्रमुख पिके - सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद

 

*रब्बी*

१,५१,४६३ हे.

प्रमुख पिके - हरभरा, गहू, ज्वारी, कांदा

 

*उन्हाळी*

२१,९५६ हे.

प्रमुख पिके - भुईमूग, मका, ज्वारी, कांदा

 

# एकूण खातेदार संख्या २,९२,४९८

 

*अल्प / अत्यल्प भूधारक*

२,१०,५९८ (७२ टक्के)

 

*बहु भूधारक

८१,९०० (२८ टक्के)

 

# पर्जन्यमान

 

*सरासरी पर्जन्यमान ६९४ मि.मी.

 

सन २०२५ मधील प्रत्यक्ष पर्जन्यमान (जून ते सप्टेंबर - २०२५)

७२७.७ मि.मी. (१०५ टक्के)

०००

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण