सैन्यातील अधिकारी भरतीसाठी विनामूल्य पूर्व प्रशिक्षण जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा : मेजर पाथरकर
सैन्यातील अधिकारी भरतीसाठी विनामूल्य पूर्व प्रशिक्षण
जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा : मेजर पाथरकर
अकोला, दि. २० : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती
होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रातर्फे एसएसबी
पूर्वतयारी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रशिक्षण दि. १५ जून २०२६ ते २८ ऑगस्ट या कालावधीत होणार असून प्रशिक्षणार्थ्यांना
निवास, भोजन व प्रशिक्षणाची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अकोला
जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी दि. १० जून रोजी जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी
सैनिक कल्याण विभाग यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावरून एसएसबी-६७ कोर्ससाठीचे प्रवेशपत्र
व आवश्यक कागदपत्रांची यादी पाहून त्याच्या दोन प्रती प्रिंट करून पूर्ण भरून सोबत
आणाव्यात.
या कोर्ससाठी पात्रता म्हणून उमेदवारांनी खालीलपैकी किमान एक अट पूर्ण
केलेली असावी : युपीएससीमार्फत घेण्यात येणारी संयुक्त डिफेन्स सेवा (सीडीएस) किंवा
नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा उत्तीर्ण असणे व एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असणे,
एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ए किंवा बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण होऊन एसएसबीसाठी शिफारस असणे,
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीलअंतर्गत एसएसबी कॉल लेटर
प्राप्त झालेले असणे.
अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथील प्रभारी
अधिकाऱ्यांशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२
तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ९१५६०७३३०६ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर (सेना मेडल, निवृत्त) अकोला यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा