युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा

 

अकोला, दि. 22 : ‘महाज्योती’मार्फत  युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी दि. 16 जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘महाज्योती’मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. निविदा प्रक्रियेतून एजन्सी नियुक्त करून दि. 16 जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस पात्र असलेल्या 20 हजार 218 उमेदवारांपैकी 13 हजार 184 उमेदवारांनी महाराष्ट्रातील 102 आणि दिल्ली येथील 2 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली.

काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या. त्याच्या चौकशीसाठी महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्त केले. चौकशी अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तपास केला. अहवालानुसार व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. 

परीक्षेत विद्यार्थ्याकडून गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्याची सूचना ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिले आहेत. पुन्हा होणाऱ्या प्रवेश परीक्षेची तारीख ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ