महसूल सप्ताह नियोजनपूर्वक व समन्वयाने सर्वदूर यशस्वी करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

 

महसूल सप्ताह नियोजनपूर्वक व समन्वयाने सर्वदूर यशस्वी करा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 31 : महसूल विभागामार्फत उद्यापासून (दि. 1 ऑगस्ट) 7 ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच  विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी शिबिरे घेण्यात येतील. सर्व तालुक्यांत महसूल सप्ताहाचे नियोजनपूर्वक व समन्वयाने यशस्वी आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

सप्ताहाच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव व विविध अधिकारी उपस्थित होते.

सप्ताहाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 7 वाजता श्रमदानाने होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी श्रमदानात सहभागी होतील. दि. 2 ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’, दि. 3 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’, दि. 4 ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’ कार्यक्रमात कार्यक्रम होईल. दि. 5 ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’, दि. 6 ऑगस्ट, रोजी ‘महसूल सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद’ होईल. दि. 7 ऑगस्ट, रोजी सप्ताहातील कार्यक्रमांची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन सांगता होईल.

ई- हक्क पोर्टलबाबतची कार्यवाही, महसूल नोंदी दुरुस्ती, गाव तिथे स्मशानभूमी सुविधा निर्माण करण्यासाठी मोहिम, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, सैनिकांना प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात येतील. सलोखा योजनेत गावागावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी तलाठी कार्यालयांमार्फत शिबीरांचे आयोजन करण्यात येईल.

 

विविध मान्यवर व अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवून महसूल सप्ताह यशस्वीपणे साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ