जि.प.,पं.स. पोटनिवडणुक: मतदान, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

 




अकोला, दि.३०(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची सज्जता झाली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निवडणुक पूर्व तयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व निवडणुक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या२८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या मतदानासाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट-८१, मुर्तिजापूर-८३,  अकोला -८५, बाळापूर -७४,  बार्शी टाकळी – ४९, पातुर-३९ असे एकूण ४८८ मतदान केंद्र आहेत. ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकुण ४४ झोन तयार करण्यात आले आहेत. ही सर्व निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष, १८२१ मतदान अधिकारी असे एकूण २४२८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षणही पार पडले आहे. या शिवाय  पोलीस बंदोबस्तही सज्ज करण्यात आला आहे.

निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २२ पथके तैनात करण्यात आले आहेत. त्यात तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला व बाळापूर येथे प्रत्येकी चार तर बार्शी टाकळी व पातुर येथे प्रत्येकी एक पथकांचा समावेश आहे.

मतदान व मतमोजणी प्रक्रिये दरम्यान संबंधित क्षेत्रात मद्यविक्री बंद करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला निर्देश देण्यात आले. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी माहिती सादर केली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ