अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा ; पुर पाहणाऱ्यांची गर्दी रोखण्याचे निर्देश

 अकोला, दि.२७(जिमाका)- भारतीय हवामान विभाग, नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार, दि.३० पर्यंत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात  आला आहे.  त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जनतेने व सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी  नद्यांना आलेले पूर पाहण्यासाठी काही लोक गर्दी करत असून पुराच्या पाण्यात उड्या मारुन पोहत असल्याची दृष्ये विविध वृत्तवाहिन्यांवरुन दाखविली जात आहेत. अशा अनाठायी साहस करणाऱ्यांची गर्दी रोखण्याची व त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देशही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.

 

वादळात तसेच विजांचा कडकटात होत असतांना  नागरिकांनी  पूर्वकल्पना आल्यास घराबाहेर पडू नये. मोकळ्या जागेत असल्यास जवळच्या सुरक्षित इमारतीत सहारा घ्यावा. घराच्या बाल्कनी, ओटे येथे थांबू नका. घरात सुरु असलेली विद्युत उपकरणे तात्काळ बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब  तसेच अन्य लोखंडी वस्तुंपासून दुर रहा. आकाशात विजा चमकत असल्यास मोबाईलचा वापर करु नका.

पूरस्थितीत नागरिकांनी पूर प्रवाहात प्रवेश करु नये. गटारे, नाले, पूल, नदी, ओढे इ. पासुन दूर रहा. विद्युत खांब आणि तुटून खाली पडलेल्या वीज वाहिनीपासून दूर रहा. ड्रेनेजची ठिकाणे, धोक्याची ठिकाणे यासारख्या ठिकाणी सतर्क रहावे.  पूराच्या पाण्यात वाहने नेऊ नका. पुलावरुन पाणी वाहत असल्यास आपली वाहने त्यातून नेऊ नका. तलाव, ओढे, धरणक्षेत्र, नदीपात्र याठिकाणी मोबाईलद्वारे सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.

अकोला जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही वेळी विसर्ग केला जाऊ शकतो, त्याअनुषंगाने नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेऊन सज्ज रहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 जिल्ह्यात सर्वच धरणे भरले असून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग होत असून नद्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. अशा परिस्थितीत पूर पाहणारे, त्यात पोहणारे अशा अनुचित घटना रोखण्यासाठी संबंधित तहसिलदारांनी अधिनस्त पोलीस स्टेशनला आवश्यक निर्देश द्यावे, जेणेकरुन पुरात वाहुन जाणे, बुडणे अशा दुर्घटना टाळता येतील,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ