हरवले ते गवसलेः ‘आधार’ नोंदणीमुळे मिळाले बालिकेस कुटुंब

 अकोला, दि.२७(जिमाका)- महिला व बालविकास विभागाने बालकांच्या आधार नोंदणीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाची फलश्रृती झाली ती ‘आधार’ नोंदणी दरम्यान एका कुटुंबापासून दुरावलेल्या बालिकेला पुन्हा तिचे कुटुंब मिळण्यात.

                          सन २०१९ मध्ये येथील गायत्री बालिकाश्रमात एक बालिकेस दहिहांडा पोलीस स्टेशनमार्फत दाखल करण्यात आले. ही बालिका तिचे राहण्याचे ठिकाण हे बिहार, पटना, दिल्ली  असे काहीतरी सांगत होती. तिला घरच्यांचे  नाव व अन्य माहितीही सांगता येत नव्हती. तिचे नाव ती ‘परी’ असे सांगत होती. बालिकाश्रमात दाखल झाल्यानंतर या बालिकेच्या पालकांचा तपास करण्यास सर्व तपास यंत्रणा काम करीत होत्या.

                 दरम्यान, बालगृहातील बालकांचे बॅंक खाते उघडणे व त्यासाठी आधारकार्ड नोंदणी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी महिला व बालविकास विभागाला दिले होते. त्यानुसार,  महिला व बालविकास विभागाच्या सर्व बालगृहातील बालकांच्या आधारकार्ड नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला. दि.४ सप्टेंबर रोजी गायत्री बालिकाश्रमातील बालकांचे आधार कार्ड साठी नोंदणी करण्यात आली. त्यावेळी संपर्कासाठी अधीक्षक वैशाली भटकर यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. 

                 दहा दिवसांनंतर  ‘परी’ चे आधार कार्ड नोंदणी रद्द झाली असल्याचा मेसेज श्रीमती भटकर यांना आला. त्याचे कारण ह्या बालिकेचे आधारकार्ड यापूर्वीच म्हणजे सन २०१५ मध्येच काढण्यात आले होते. तथापि, आधार च्या कस्टमर केअर सेंटरने तिची संपूर्ण माहिती गोपनीयतेच्या कारणास्तव देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानुसार महिला व बालविकास विभागाचे सुनिल लाडुलकर यांनी आधार कार्डचे जिल्हा समन्वयक सौरभ जैन यांना संपर्क केला. त्यांनी  शाळा क्रमांक १४ येथील आधार केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे या बालिकेस तेथे नेऊन तिचे अंगठ्याचे ठसे घेऊन  तिचे मुळ आधारकार्ड डाऊनलोड करण्यात आले.  त्यावर तिचा पत्ता व अन्य माहिती मिळाली. विशेष म्हणजे हा पत्ता अकोल्याचाच होता. आणि तिचे नाव ‘लक्ष्मी’ होते. आधार कार्डावर दिलेल्या पत्त्यावर जाऊन महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क केला.  तेव्हा हे कुटुंब येथून  नागपूर येथे स्थलांतरीत झाल्याचे समजले. तेथून काही लोकांकडून  बालिकेच्या वडीलांचा नंबर मिळवला. त्यावर संपर्क केला असता, सर्व उलगडा झाला.

                 या मुलीच्या पालकांची आणि तिची ओळख पटवण्याचे सर्व सोपस्कार  पार पाडल्यानंतर शनिवार दि.२५ रोजी या बालिकेस घेण्यासाठी  तिचे पालक नागपूरहून अकोल्यात आले.  ‘लक्ष्मी’ ला महिला व बालविकास विभागाने तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

                        जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे,  सुनिल लाडूलकर, अधीक्षक वैशाली भटकर व अन्य कर्मचाऱ्यांनी ह्या तपासाची चक्रे गतिमान ठेवल्याने कुटुंबापासून दुरावलेल्या बालिकेला तिचे कुटुंब पुन्हा मिळाले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ