आरोग्य विभागातर्फे धूम्रपानविरोधी दिनाचा उपक्रम
आरोग्य विभागातर्फे धूम्रपानविरोधी दिनाचा उपक्रम
अकोला, दि. 31 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे १ जानेवारी रोजी धूम्रपानविरोधी
दिन उपक्रम राबविण्यात येईल.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांनी तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प करावा,
या उद्देशाने हा दिवस प्रतीकात्मक स्वरूपात पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या
गंभीर धोक्यांबाबत जनजागृती करणे आणि लोकांना धूम्रपान व तंबाखूचे सेवन सोडण्यासाठी
प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल.
धुम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनामुळे तोंड, फुफ्फुसे, घसा, अन्ननलिका,
स्वादुपिंड व मूत्राशयाचा कर्करोग, हृदयविकार, स्ट्रोक, सीओपीडी, दमा, मधुमेह, दंतविकार
तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. गर्भावस्थेत तंबाखूचे सेवन केल्यास
गर्भपात, अकाली जन्म व बाळाच्या मृत्यूचा धोका वाढतो.तंबाखूमध्ये असलेले निकोटीन, टार
व कार्बन मोनोऑक्साइड हे घटक शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी करून पेशींना नुकसान पोहोचवतात.
त्यामुळे नववर्षानिमित्त संबंधितांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करून अमलात
आणावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
बळीराम गाढवे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा