शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढा समाजकल्याण सहायक आयुक्तांचे आवाहन
शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढा
समाजकल्याण सहायक आयुक्तांचे आवाहन
अकोला दि. 16 : अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या शिष्यवृत्ती योजनांचे यावर्षीचे
केवळ 56 टक्के अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत आहेत. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित
अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे आवाहन समाजकल्याण
सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती,
राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज
गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता योजना महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे ऑनलाईन
पध्दतीने राबविण्यात येत आहेत.
महाविद्यालय स्तरावर सन 2021-22 मधील 421, सन 2022-23 मधील 705, सन 2023-24
मधील 199 व सन 2024-25 मधील 816 अर्ज प्रलंबित आहेत. या अर्जांची तपासणी पडताळणी करून
पात्र अर्जावर कार्यवाही करावी. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात
यावे जेणेकरून विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. सर्व महाविद्यालयांनी गांभीर्याने
नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा