मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी जमाबंदी आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी
जमाबंदी आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना जारी
अकोला, दि. १७ : खरीप हंगाम 2025 मध्ये विहीत मुदतीत ई- पीक पाहणीची
नोंद न झालेल्या शेतक-यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जमाबंदी
आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकरी बांधवांनी ऑफलाईन
पाहणीचे अर्ज 24 डिसेंबरपूर्वी ग्राम महसूल अधिका-यांकडे देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून
करण्यात आले आहे.
याबाबतचा शासन निर्णय 14 डिसेंबर 2025 रोजी जारी झाला. त्यानुसार जमाबंदी
आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून सर्व जिल्ह्यांना या सूचना
निर्गमित करण्यात आल्या आहेत. ऑफलाईन पाहणीसाठी
ग्रामस्तरीय समिती मंडळ अधिका-यांच्या अध्यक्षतेत स्थापण्यात येत असून, ग्राम महसूल
अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी हे सदस्य आहेत.
ज्या शेतक-यांना काही कारणांस्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पिकांची नोंद
करता आली नाही, अशा शेतक-यांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे दि. 17 डिसेंबर ते
24 डिसेंबरपर्यंत पिकांची नोंद करण्याबाबत अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने
ग्रामस्तरीय समितीने संयुक्तपणे संबंधित शेतक-याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी
25 डिसेंबर ते 7 जानेवारीदरम्यान करावी. पाहणीची
वेळ निश्चित करून पूर्वकल्पना संबंधित शेतकरी व शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान
4-5 शेतक-यांना लेखी द्यावी.
पाहणीत स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीसाठी वस्तुस्थितीदर्शक पंचनामा
करावा व शेताच्या बांधाला लागून असलेले इतर शेतक-यांचे जबाब नोंदवावेत. लागवडीसाठी
खरेदी केलेले बियाणे, खते आदींच्या खरेदी पावत्या तपासून नोंद घ्यावी. गतवर्षीच्या
पीक पाहणीची नोंद नमूद करावी. चौकशीअंती पिकाचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात लिहावे. सर्व
अहवाल मंडळ अधिका-यांनी एसडीओ यांच्या अध्यक्षतेतील समितीला गावनिहाय एकत्रपणे दि.
12 जानेवारीपूर्वी सादर करावा. खाते क्रमांक, नाव, गट क्र., एकूण क्षेत्र, पिकांची
नावे, क्षेत्र आदी बाबी नमूद कराव्यात. त्यानंतर
एसडीओंनी सर्व बाबी तपासून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा. जिल्हाधिका-यांकडून
अहवाल शासनाला देण्यात येईल.
ऑफलाईन पाहणीचे वेळापत्रक
शेतक-यांनी ग्राम महसूल अधिका-यांकडे अर्ज करणे – 17 ते 24 डिसेंबर
ग्रामस्तरीय समितीने करावयाची स्थळपाहणी- 25 डिसेंबर ते 7 जानेवारी
उपविभागीय समितीकडे अहवाल देणे- 8 ते 12 जानेवारी
जिल्हाधिका-यांकडे अहवाल देणे- 13 ते 15 जानेवारी
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा