ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ





 

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट

प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

अकोला, दि. 18 :  यंदा जिल्ह्याला शासनाने 82 लक्ष रू. ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे महान कार्य करणा-या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून जिल्ह्यात उद्दिष्टाहून अधिक निधी संकलित होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.  

सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निमित्त ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या हस्ते माजी सैनिक वसतिगृहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ध्वजदिन निधी संकलन  समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, उपशिक्षणाधिकारी जितेंद्रकुमार प्रधान, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, अंगाची लाही करणारे ऊन, हाडे गोठवणारी थंडी, वादळवारे अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्ये व रचना असलेल्या निरनिराळ्या भागात सैनिक अहोरात्र देशसंरक्षणाचे कार्य करत असतात. त्यांच्यामुळेच आपण सर्व आज सुरक्षित आहोत. वीरजवान व त्यांच्या कुटुंबियांसाठी ध्वजदिन निधीतून विविध योजना राबवल्या जातात. गतवर्षी जिल्ह्याने उद्दिष्ट्याच्या 110 टक्के पूर्तता केली. यंदाही उद्दिष्टाहून अधिक निधी संकलित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेजर आनंद पाथरकर यांनी प्रास्ताविकात सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. वैभवकुमार निमकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या सैनिकांच्या कुटुंबातील वीरमाता व वीरपत्नी यांना यावेळी गौरविण्यात आले. माजी सैनिकांच्या कुटुंबियांतील गुणवंत पाल्यांचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव झाला. क्रीडापटू गणेश वानखडे, क्रीडापटू सिमरन गवई यांना प्रत्येकी 25 हजार रू. व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी अंजली मोहाडे यांना 20 हजार रू. व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना