नववर्ष स्वागत : उपाहारगृहांना सूचना ‘एफडीए’ची ‘नववर्ष संकल्प- सुरक्षित अन्न मोहिम’
नववर्ष स्वागत : उपाहारगृहांना सूचना
‘एफडीए’ची ‘नववर्ष संकल्प- सुरक्षित अन्न मोहिम’
अकोला, दि. ३१: नववर्षाच्या स्वागतासाठी
दि. ३१ डिसेंबर रोजी हॉटेल, उपाहारगृहे, ढाबे, फार्महाऊस, रिसॉर्ट, तसेच इतर अन्न आस्थापनांमध्ये
मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना
स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळण्यासाठी सर्व व्यवसायचालकांनी अन्न सुरक्षा व
मानके कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनातर्फे
करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे “नववर्ष संकल्प-
सुरक्षित अन्न मोहीम" हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छता व सुरक्षिततेबाबत
मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिसर निर्जंतुक ठेवा
अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात
येणारी सर्व भांडी, उपकरणे, काऊंटर व स्वयंपाकगृह परिसर स्वच्छ व निर्जंतुक असावा,
कच्चे अन्नपदार्थ (भाजीपाला, मांस, मासे) व शिजवलेले अन्न वेगवेगळ्या व स्वच्छ ठिकाणी
साठवावे, स्वयंपाकघर, साठवण कक्ष, शीत गृह व कचरा साठवणूक क्षेत्र स्वच्छ ठेवावे. योग्य वायुविजन असावे, अन्न पदार्थ विक्रीसाठी वृत्तपत्र,
छापील कागद किंवा वापरात आलेले कागद वापरू नयेत.
खाद्यपदार्थांसाठी योग्य
साहित्य वापरा
खाद्यपदार्थांसाठी योग्य साहित्यच
वापरणे बंधनकारक आहे, तेलाचा वारंवार किंवा अतिवापर टाळावा. खराब, जळलेले अथवा वारंवार
वापरलेले तेल अन्न तयार करण्यासाठी वापरणे आरोग्यास घातक आहे, अन्न तयार करणारे व विक्री
करणारे कर्मचारी स्वच्छ कपडे, एप्रन, हेडकॅप व गरजेनुसार हातमोजे वापरावेत, पाणी शुद्ध
व पिण्यायोग्य असावे व त्याची नियमित स्वच्छता तपासणी करण्यात यावी. कीड, उंदीर, माशा
यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
आईस्क्रीमच्या नावे ‘फ्रोजन
डेझर्ट’ देऊ नका
अन्न सुरक्षा परवाना/नोंदणी प्रमाणपत्र
स्पष्टपणे दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे, विक्री करू नये, पनीरच्या जागेवर चीज अॅनलॉग,
आइसक्रीम नावाने फ्रोजन डेझर्ट या अन्न पदार्थाची ग्राहकांना विक्री करू नये, अन्न
सुरक्षा अधिकारी यांना कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले दाखवावीत, शिळ्या, एक्स्पायर
अथवा कमी दर्जाच्या, मानवी सेवनास असुरक्षित अन्न पदार्थाची विक्री करू नये.
आढळल्यास कारवाई करणार
अन्न सुरक्षा व मानके कायदा,
2006 तसेच त्याअंतर्गत नियम व नियमनांचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित अन्न व्यवसाय
चालकाविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई, दंड अथवा परवाना निलंबन रद्द करण्याची कारवाई
करण्यात येईल.
चांगल्या आस्थापनांना गौरविणार
अन्न व्यवसाय चालक यांच्या आस्थापना
तपासणीनुसार ग्राहकांना स्वच्छ, चांगले अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या अन्न व्यवसाय चालक
यांना पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रमाणपत्राद्वारे गौरव करण्यात येईल.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी अस्वच्छ, उघड्यावरील,
शिळे आणि वृत्तपत्रात विक्री केले जात असलेले अन्न पदार्थ खरेदी करू नयेत. अतिरंगयुक्त
अन्न पदार्थ सेवन करू नयेत. तसेच अन्न पदार्थ कोणत्या माध्यमातून तयार केले आहेत याबाबत
विक्रेता यांना विचारणा करून त्याबाबत खरेदी देयक घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे
सहायक आयुक्त यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा