आधार नोंदणीच्या साह्याने शोध 11 वर्षांनंतर मुलगा स्वगृही पोहचला महिला व बालविकास कार्यालयाचे प्रयत्न
आधार नोंदणीच्या साह्याने शोध
11 वर्षांनंतर मुलगा स्वगृही पोहचला
महिला व बालविकास कार्यालयाचे प्रयत्न
अकोला, दि. 19 : आधारकार्डाच्या नोंदणीच्या साह्याने एका हरवलेल्या
बालकाच्या घराचा पत्ता मिळविण्यात यश आले. त्यामुळे 11 वर्षांनंतर हा मुलगा स्वगृही
परतण्याचा मार्ग मोकळा झाला.
याबाबतची हकीकत अशी की, 11 वर्षांपूर्वी 6 वर्षांचा मुलगा मध्यप्रदेशातील
जबलपूर येथून हरवला. तो महाराष्ट्रात पोलीसांना सापडल्यानंतर त्याला नागपूर येथे बालगृहात
दाखल करण्यात आले. त्यानंतर मुंबई, बीड, बुलडाणा अशा विवीध जिल्ह्यांतील बालगृहात तो
राहत होता.
बुलडाणा येथे शासकीय बालगृहात असताना तिथे त्याची आधार नोंदणी करण्यात
आली. मात्र 3 ते 4 वेळा नोंदणी करून सुध्दा आधारकार्ड प्राप्त होत नव्हते. आधार तक्रार
केंद्राशी संपर्क साधूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे शासकीय बालगृहाचे शिक्षक केशव
घुगे यांनी अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर यांना फोन करून अडचण सांगितली.
त्यानंतर श्री. लाडूलकर यांनी संबंधित बालकाच्या आधार नोंदणीच्या पावत्या मागवून घेतल्या
आणि आधार नोंदणीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी स्वतंत्रपणे पाठपुरावा सुरू केला.
या बालकाची बुलडाणा येथे झालेली नोंदणी रद्द झाली. या बालकाचे यापूर्वीचे
आधारकार्ड असल्यामुळे नवी नोंदणी होऊ शकलेली नाही, असे ग्राहक सेवा प्रतिनिधीने सांगितले.
त्यावरून श्री. लाडुलकर यांनी जुन्या आधारकार्डावरील पत्ता देण्याबाबत विनंती केली.
तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशी माहिती देता येत नाही. आपण असमर्थ आहोत,
असे ग्राहक प्रतिनिधीने सांगितले. मात्र, याबाबत याचवेळी ऑनलाईन तक्रार नोंदवून घेण्यात
आली.
ऑनलाईन तक्रार दाखल केल्यावर 30 दिवसांनंतर तक्रारीचे निराकरण होऊन
जुना आधार क्रमांक प्राप्त होऊ शकला. तो आधार क्रमांक मिळाल्यानंतर बुलडाणा महिला व
बालविकास यंत्रणा व अधिक्षकांनी त्या बालकाला आधार सेंटरवर नेले. तिथे हाताचे ठसे देऊन
बालकाचे जुने आधारकार्ड डाऊनलोड करण्यात आले.
त्या आधारकार्डावर जबलपूर येथील पत्ता आढळला. या पत्त्यानुसार संबंधित
जबलपूरच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना संपर्क करण्यात आला.
अकोला व बुलडाणा महिला बालविकास यंत्रणेतर्फे पाठपुरावा करून बालकाला
जबलपूर प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आले. 11
वर्षानंतर बालक स्वजिल्ह्यात दाखल झाला असून, तेथील तांत्रिक प्रक्रियेनंतर तो स्वगृही
परतणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा