‘महाबीज’च्या शिवारफेरीद्वारे उत्पादनक्षम वाणांबाबत मार्गदर्शन
‘महाबीज’च्या शिवारफेरीद्वारे
उत्पादनक्षम वाणांबाबत मार्गदर्शन
अकोला, दि. ३० : ‘महाबीज’च्या पैलपाडा येथील उत्कृष्टता केंद्रावर दि.
४ फेब्रुवारीपर्यंत शिवारफेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीत गव्हाचे अधिक उत्पादनशील
३३ वाण व हरभ-याच्या ३८ वाणांची माहिती शेतक-यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून शेतकरी
बांधव या फेरीत सहभागी होत आहेत.
‘महाबीज’चे पैलपाड्याला ५७ एकरांचे विस्तीर्ण प्रक्षेत्र आहे. गव्हाच्या
३३ व हरभ-याच्या ३८ वाणांची माहिती, तसेच संकरित ज्वारी, मका, जवस, बाजरी, सूर्यफुल
आदी पीके व ‘महाबीज’ संशोधित नव्या भाजीपाला वाणांचा शिवारफेरीत समावेश आहे.
रब्बी व उन्हाळी पीकांच्या विविध वाणांचे गुणधर्म शेतक-यांना एकाच ठिकाणी
अनुभवता यावे व त्यानुरूप त्यांच्या जमीनीला अनुकूल वाणांची निवड करता यावी, हा शिवारफेरीचा
उद्देश आहे.
शेतकरीभिमुख उपक्रम राबविणार- श्री. कुंभेजकर
फेरीचा शुभारंभ ‘महाबीज’चे
व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते मंगळवारी झाला. संचालक वल्लभराव
देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ, महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने, भागधारक, शेतकरी उपस्थित
होते. उत्पादनक्षम बियाणे संशोधन व शेतकरीभिमुख उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही
श्री. कुंभेजकर यांनी यावेळी दिली.
शिवारफेरीत पहिल्या दिवशी जळगाव, जालना, पुणे येथील शेतक-यांनी सहभाग
घेतला. दि. ४ फेब्रुवारीला परभणी व नागपूर विभागातील शेतक-यांच्या उपस्थितीत सांगता
होणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. कुंभेजकर
यांनी केले. श्री. देशमुख, डॉ. सपकाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. बीजपरीक्षण अधिकारी
राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा व्यवस्थापक गणेश डहाळे यांनी आभार मानले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा