विकासकामांना चालना देण्यासाठी मान्यतांची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करा जिल्हाधिकारी अजित कुंभार
विकासकामांना चालना देण्यासाठी मान्यतांची कार्यवाही आठवडाभरात
पूर्ण करा
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 8 : चालू आर्थिक वर्षातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी
केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, अनेक विभागांच्या प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही
अद्यापही पूर्ण नाही. ही कार्यवाही पुढील सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
नियोजनभवनात जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा घेताना ते बोलत
होते. जिल्हा परिषदेच्या सीईओ बी. वैष्णवी, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी
विजय पाटील,जिल्हा नियोजन अधिकारी रा. ग. सोनखासकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यात विविध क्षेत्रांच्या
विकासासाठी अधिकाधिक कामांचा समावेश करून नियोजन करण्यात येते. त्याची अंमलबजावणी करण्याची
जबाबदारी विभागप्रमुखांची आहे. तथापि, नियोजन निधीनुसार अनेक विभागांनी मान्यतांची
कार्यवाही अद्यापही पूर्ण केली नाही. मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण होऊन जानेवारीअखेरपर्यंत
कामांना चालना देणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास निधी इतर विकासकामांकडे वळविण्यात येईल.
शिक्षण विभाग, पशुसंवर्धन, वन विभाग, पोलीस, सार्वजनिक आरोग्य, मृद
व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विविध विभागांच्या विकासकामांबाबतच्या कार्यवाहीचा
आढावा यावेळी घेण्यात आला.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा