पाणलोट विकासकार्यात लोकसहभाग मिळविण्यासाठी पाणलोट यात्रा जिल्ह्यात व्यापक जनजागृती करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
पाणलोट विकासकार्यात लोकसहभाग मिळविण्यासाठी पाणलोट यात्रा
जिल्ह्यात व्यापक जनजागृती करा
- जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 8
: राज्यात पाणलोट विकासाची चळवळ निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत जानेवारी महिन्यात पाणलोट यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता व लोकसहभाग मिळविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले.
पाणलोट विकास यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सीईओ बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील,जिल्हा जलसंधारण अधिकारी अ. दि. मस्कर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, मृद व जलसंधारणाशी निगडित बाबी, त्याचे महत्व आणि पाणलोट विकासाविषयी लोकशिक्षण देणे, या कामांविषयी नागरिकांमध्ये ममत्वाची भावना निर्माण होऊन त्याच्या देखभाल-दुरूस्तीच्या कार्यात लोकसहभाग मिळवणे आदी उद्दिष्ट्ये बाळगून पाणलोट यात्रा काढण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभाग नोडल विभाग म्हणून कार्यरत असला तरीही तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर सर्व विभागांनी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी समन्वयाने कामे करावीत. प्रभावी प्रसिद्धी करून हा उपक्रम व्यापकपणे राबवावा.
जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. मस्कर यांनी उपक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 12 गावांत यात्रा पोहोचून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. पाणलोट विकासासाठी कार्यरत उत्तम कार्यकर्त्यांना पाणलोट योद्धा म्हणून गौरविण्यात येणार आहे. सर्व तालुका प्रशासनाने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे व अधिकाधिक लोकसहभाग मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा