नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी व्यापक तपासण्या व कडक कारवाई करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार






 

 

नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी व्यापक तपासण्या व कडक कारवाई करा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि.  1 : नायलॉन मांजा मानवी जिवित व पशुपक्ष्यांच्या दुखापतीस, अपघातास कारणीभूत ठरतो. त्यामुळे त्याची वाहतूक, विक्री व वापर जिल्ह्यात पूर्णपणे रोखण्यासाठी व्यापक तपासण्या आणि कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने नायलॉन मांज्याची अवैध वाहतूक, विक्री व वापरावर बंदी आणून विक्रेत्यांवर कारवाई आदी पूर्वतयारीसाठी बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी महेश भिवापूरकर, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. शंकर शेळके व इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, नायलॉन मांजाचा वापर मानवी जिविताबरोबरच पशुपक्ष्यांनाही घातक ठरतो. नायलॉन, सिथेंटिक मांजाबरोबरच ग्लास कोटेड कॉटन थ्रेड मांजाही घातक आहे. त्यामुळे त्याची विक्री, वापर, वाहतूक पूर्णपणे रोखणे आवश्यक आहे.  महापालिका, नगरपालिका, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वनविभाग आदी यंत्रणांनी व्यापक तपासण्या व कठोर कारवाई करावी.

जिल्हा पोलीसांकडून अकोला जिल्ह्यातील 20 गुन्ह्यांत 21 आरोपींवर कारवाई, तसेच 5 लक्ष 750 रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महापालिकेडून 87 ठिकाणी तपासणी करून 38 रील मांजा जप्त करण्यात आला, तसेच संबंधितांना 23 हजार रू. दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती डॉ. लहाने यांनी दिली. महापालिकेने केलेल्या कारवाईत दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्दश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

 

नायलॉन मांज्याची अवैध वाहतूक, विक्री व वापरावर बंदी आणून विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी 2022 मध्ये पथक गठित करण्यात आले. या पथकाने अद्यापपावेतो केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा. जिल्ह्यात नायलॉन मांजाचे उत्पादन होते किंवा कसे, याबाबत ‘एमपीसीबी’ने वेळोवेळी तपासण्या कराव्यात. नायलॉन मांजा विक्रीबाबत नागरिकांना तक्रार द्यावयाची असल्यास तसे दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्याचे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले.  जिल्ह्यात नगरपालिकांकडून घंटागाडीद्वारे उद्घोषणा, पोस्टर आदी जनजागृतीविषयक उपक्रम राबवले जात असल्याचे डॉ. वडजे यांनी सांगितले.

याठिकाणी करा तक्रार

नायलॉन मांजाची विक्री, वाहतूक व वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. महापालिका क्षेत्रात असे आढळल्यास नागरिकांनी दक्षिण झोनल अधिकारी देवीदास निकाळजे यांच्याकडे 98502 03161 या, पूर्व झोनल अधिकारी विजय परतवार यांच्याकडे  77091 77666 या, पश्चिम झोन अधिकारी दिलीप जाधव यांच्याकडे 8208754441

या आणि उत्तर झोन अधिकारी विठ्ठल देवकाते यांच्याकडे  9822563268 या भ्रमणध्वनी क्रमांकावर माहिती द्यावी. तसेच अकोट शहरात अक्षय फरतोडे भ्र. क्र. 9011956562, तेल्हारा शहरात रूपेश जोगदंड भ्र. क्र. 7972658134, पातूर येथे श्रीकृष्ण पाटील भ्र. क्र. 9421746942, बार्शिटाकळी शहरात आदिल शेख भ्र. क्र. 9823691663, बाळापूर शहरात अरविंद जाधव भ्र. क्र. 8308327308, मूर्तिजापूर शहरात नरसिंह चावरे भ्र. क्र. 8308006085, तसेच हिवरखेड येथे कैलास डांगे भ्र, क्र. 9766724107 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :