स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा समाजकल्याण विभागाचे आवाहन

 

 

 

 

 

 योजनेत सुधारित निकष

स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा

समाजकल्याण विभागाचे आवाहन

अकोला, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईनरीत्या स्वीकारण्यासाठी मोड्युल ‘महाआयटी’कडून सुरू करण्यात आले आहे. सुधारित शासन निर्णयानुसार पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

योजनेद्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात थेट वितरित केली जाते. विद्यार्थ्यांना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरता येतील. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, पोलीस वसाहत, दक्षतानगर, अकोला येथे संपर्क करावा.  

योजनेचे निकष :  विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी किंवा त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थी स्थानिक नसावा.  महापालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थीही पात्र असतील. अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान 50 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन अनिवार्य आहे. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ नाही.

इयत्ता 12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी ही दोन वर्षांपेक्षा कमी नसावा. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेस पात्र ठरतो.  

व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्यास स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तरला लाभ अनुज्ञेय राहील.

योजनेमध्ये अनु. जाती. व नवबौद्ध घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य.

महिलांसाठी 30  टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय राहील.

 

एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास अनुतीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 8 वर्ष स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल.   कमाल वयोमर्यादा 30 वर्ष इतकी राहील.

शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र असेल मात्र, खंड हा 2 वर्षापेक्षा जास्त असू नये.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :