सफाई कर्मचाऱ्यांच्या आवास, आरोग्य व सामाजिक सुरक्षेला प्राधान्य द्या -राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर आयुष्मान भारत कार्ड, नियमित आरोग्य तपासणी व शैक्षणिक सुविधांवर भर
सफाई
कर्मचाऱ्यांच्या आवास, आरोग्य व सामाजिक सुरक्षेला प्राधान्य द्या
-राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग
डागोर
आयुष्मान
भारत कार्ड, नियमित आरोग्य तपासणी व शैक्षणिक सुविधांवर भर
अकोला, दि. २७ : शहराची स्वच्छता आणि आरोग्यदायी
वातावरण राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समाजाच्या आरोग्याची
काळजी घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या आवास, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेच्या
प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने लक्ष द्यावे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून
आणण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे
अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आयोजित आढावा
बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, अप्पर जिल्हाधिकारी ज्योती कदम,
निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाने, नगरविकास प्रशासन सहाय्यक आयुक्त विश्वनाथ
वडजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्यासह समाज कल्याण, पोलीस, सार्वजनिक
बांधकाम विभाग तसेच विविध विभागांचे अधिकारी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित
होते.
श्री. डागोर म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांना
कायमस्वरुपी स्वत:च्या मालकीचे हकक्काचे घर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सेवेचे
25 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र कर्मचारी तसेच कर्मचारी मयत झाल्यास त्यांच्या वारसांना
निवासाची सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी. सफाई कर्मचाऱ्यांना अनेकदा जोखमीच्या
परिस्थितीत काम करावे लागते, त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई किट, सुरक्षा
वस्त्रे व सफाईचे सर्व साहित्य पुरवावे, त्याच्या नियमित वापरासंबंधी मार्गदर्शन करावे.
त्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन ठरावीक कालावधीनंतर नियमित व सर्वंकष
आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व कर्मचाऱ्यांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्याची प्रक्रिया
पूर्ण करून त्यांना कॅशलेस वैद्यकीय उपचार सुविधेचा लाभ मिळवून द्यावा.
कर्मचाऱ्यांच्या
पाल्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष द्या
सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे सामाजिक
व शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध
करून देण्याबाबत प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती,
तसेच कर्मचाऱ्यांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून द्यावा. ज्या बँकांमध्ये
कर्मचाऱ्यांची वेतन खाती आहेत, त्या बँकांकडून वेतन खात्याशी संबंधित उपलब्ध असलेल्या
विमा व अन्य सुविधांची माहिती घेऊन त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळवून द्यावा. मयत कर्मचाऱ्यांच्या
संदर्भात त्यांच्या अवलंबितांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी वारसांना नियुक्ती
देऊन नोकरीत सामावून घ्यावे. सफाई कर्मचारी यांच्यासाठी अंमलात असलेल्या विविध शासकीय
योजनांचा लाभ कालमर्यादेत प्राधान्याने संबंधितांना मिळवून द्यावा, असेही श्री. डागोर
यांनी यावेळी सांगितले.
सुट्ट्यांच्या
अधिकाराची अंमलबजावणी करा
सफाई कर्मचाऱ्यांनाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे
नियमानुसार सुट्ट्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांपासून वंचित ठेवू नये.
त्यांच्या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना
सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना आणि
सुविधांची माहिती मिळावी, यासाठी विशेष माहिती शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचनाही
अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या
व त्यांचे पुनर्वसन, शैक्षणिक व आरोग्य सुविधांबाबत श्री. डागोर यांनी शासकीय विभागांकडून
सविस्तर आढावा घेतला. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करून त्यांना सन्मानजनक
जीवन जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने समन्वयाने
कार्यवाही करावी, असा सूचना श्री. डामोर यांनी बैठकीत दिल्या.
00000

.jpeg)



.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा