दुष्काळ निवारणासाठी व्हिबी-जी रामजी योजनेतून अधिकाधिक कामे घ्या - सचिव परीमल सिंह ; चारा लागवड व पाणी संचयनावर भर द्या ; कृषी सचिवांकडून फळबाग, शेततळे, शेती पिकांची पाहणी
दुष्काळ निवारणासाठी व्हिबी-जी रामजी योजनेतून अधिकाधिक कामे घ्या
- सचिव परीमल सिंह
* चारा लागवड व पाणी संचयनावर भर द्या
* कृषी सचिवांकडून फळबाग, शेततळे, शेती पिकांची पाहणी
अकोला, दि. २७ : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर
मात करण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्हीबी-जी राम जी) अंतर्गत
अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. चारा लागवड आणि जल संचयनावर विशेष लक्ष केंद्रित करून
जिल्ह्यात कायमस्वरूपी मत्ता व पायाभूत संरचना उभारण्याचे दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न
करावे, असे निर्देश कृषी विभागाचे सचिव तथा पालक सचिव परीमल सिंह यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत
जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती व उपाययोजनांचा श्री.सिंह यांनी आज सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना,महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपवनसंरक्षक सुमंत
सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यासह
विविध विभागांचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य
परिस्थितीवर मात करण्यासाठी जल संचयन व चारा लागवडीचे प्रभावी नियोजन करावे. पाणी टचाई
निवारणार्थ मंजूर उपाययोजनांचे उत्तम नियोजन करावे. पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार
पुरेसा जलसाठा आगामी सहा महिन्यापर्यंत पुरेल, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पशुधनाला
चारा उपलब्धतेसाठी वनविभाग व गाळपेर जमीनीवर चारा लागवड करण्यात यावी. शेतकऱ्यांना
चारा लागवड तसेच जलतारा सारखे प्रयोग शेतात घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी
सांगितले.
व्हीबी-जी रामजी ‘विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार
अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ कायदा, २०२५ नुसार कडधान्यांची लागवड, फळबाग लागवड अशा
प्रकारची शेती कामे, बंधारा बांधकाम, तसेच दुष्काळ उपाययोजनांची प्रस्तावित कामे स्थानिकांकडून
करुन घ्यावीत. यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबेल, व त्यांना स्थानिकरित्या रोजगार उपलब्ध
होईल. शेतात जलताराची कामे करताना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून तांत्रिक सल्ला
घ्यावा, जेणेकरुन जलतारा कार्यान्वित होण्याची शक्यता यशस्वी होईल. शेतकऱ्यांना 5 हजार
रुपयांची अग्रीम मदत प्रलंबित प्रकरणांची तपासणी करुन पुनरावृत्ती होणार नाही, याची
दक्षता घ्यावी. प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्ररचित हवामान आधारित फळपीक विमा
योजनेत अधिकाधिक शेतकरी सहभागी होईल, यासाठी
प्रयत्न करावे, असेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील संभाव्य पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी
जिल्हा प्रशासनाने १२९ कोटी रुपयांचा टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला असून, जिल्हाधिकारी
कार्यालयात २४ तास कार्यरत 'वॉर रूम' आणि 'विशेष दुष्काळ व्यवस्थापन प्राधिकरण' स्थापन
केले आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून घुंगशी आणि काटेपूर्णा
बॅरेजमधील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तसेच शहरी भागात सुध्दा पिण्याचे
पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोजगार हमी
योजने अंतर्गत तलावांचे व नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, शेततळी, सिंचन विहिरी आणि
बंधारे बांधण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. अकोला शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी
मोर्णा धरण ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे २५.२ किलोमीटर लांबीची जलवाहिनी
टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्याचे काम
युद्धपातळीवर सुरू आहे. पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा यासाठी जिल्ह्यात चारा
विकास कार्यक्रमांना गती देण्यात आली असून पशुपालकांना चारा टंचाईचा फटका बसू नये म्हणून
प्रशासनाकडून चारा उपलब्धतेचे आणि अनुदानाचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी
श्रीमती मीना यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा पर्जन्यमान स्थिती, खरीप हंगामासाठी
तालुकानिहाय पेरणी क्षेत्र, शेतीपिक नुकसानीबाबत अहवाल, दुष्काळजन्य परिस्थितीत लागू
सवलती, 5 हजार दुष्काळ अग्रीम मदत, प्रकल्पातील जलसाठा, सभांव्य पाणी टंचाई कृती आराखडा,
पाणी टंचाई निवारणार्थ मंजूर उपाययोजना, पशुधन व चारा मागणी, चारा नियोजन, चारा लागवडीबाबत
बियाणे वाटप, रोहयो मजूर उपस्थिती, चारा लागवड व जलतारा कामांचे नियोजन, प्रधानमंत्री
पिक विमा योजना, फळपिक विमा योजना आदी संदर्भात श्री. सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला
तर जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्याची माहिती दिली.
कृषी सचिवांकडून फळबाग, शेततळे, शेती पिकांची पाहणी छायाचित्रे
बैठकीनंतर दौरा दरम्यान सचिव श्री. सिंह यांनी अकोला
तालुक्यातील मौजे येळवण येथील संत्रा फळबाग लागवड व पोकरा योजनेंतर्गत शेततळे सिंचन
योजनेअंतर्गत यंत्र औजारे बँक कामाची पाहणी केली, मौजे कानशिवणी व कुरणखेड येथील आत्मा
अंतर्गत रब्बी ज्वारी पीक पाहणी, जलसंधारण कामांची पाहणी केली.
00000




.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा