दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकार ! मुख्यमंत्री सहायता निधीस २५ लाखांची आर्थिक मदत ; सहकार क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन

 

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकार !

मुख्यमंत्री सहायता निधीस २५ लाखांची आर्थिक मदत ;

सहकार क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन

 

अकोला, दि. ०३ : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. नुकताच बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे, संचालिका सौ. अपर्णाताई धोत्रे, संचालक अनिल जाधव, डॉ. अभिषेक तिडके, अजिंक्य राजत तसेच शिरीष धोत्रे आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्या उपस्थितीत हा मदत निधीचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे सुपूर्द केला. बँकेच्या या संवेदनशील आणि स्तुत्य उपक्रमातून सहकार क्षेत्राची सामाजिक उत्तरदायित्वाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

 

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये यंदा अत्यल्प पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाणीसाठा मर्यादित असल्याने रब्बी हंगामावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांत भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत संकटग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणे, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यास हातभार लावणे आणि दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याची भावना बँकेने व्यक्त केली.

 

याच सामाजिक जाणिवेतून अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. यावेळी बँकेचे मुख्याधिकारी संजय खवले, उपमुख्याधिकारी राधिका खेरखारसिया, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी अजय माहोरे व विवेक पाटील उपस्थित होते.

 

संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी सहकाराचा आधार! दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बँकेने घेतलेला हा पुढाकार केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक संवेदनशीलता आणि सहकाराच्या मूल्यांचा प्रत्यय देणारा आहे. बँकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

00000





 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा