जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अकोल्यात प्रशिक्षणाला सुरुवात

 








जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अकोल्यात प्रशिक्षणाला सुरुवात


अकोला, दि. २१- जनगणना २०२७ चा पहिला टप्पा हा घर यादी गटाच्या निर्मितीचा असून त्याचा प्रत्यक्ष कालावधी दिनांक १६ मे  ते दिनांक १४ जून  असा होता. जनगणनेच्या या पहिल्या टप्प्याचे काम जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या अधीनस्त एकूण ७ ग्रामीण व ७ शहरी चार्जमध्ये करण्यात आले. याकरिता एकूण ९७२ गावे तसेच ८८ वार्डकरिता एकूण २३९९ घरयादी गट बनविण्यात आले होते. त्याकरिता एकूण २४१६ प्रगणक व ४३२ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आता जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजेच प्रत्यक्ष लोकसंख्या गणना असून त्याचे काम दिनांक २५ जानेवारी ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत करण्यात येणार आहे. हे काम जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी अकोला यांच्या अधीनस्त एकूण ७ ग्रामीण व ७ शहरी चार्जमध्ये पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये स्व-गणना ही दिनांक १० जानेवारी ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. मा. संचालक जनगणना संचालनालय महाराष्ट्र मुंबई यांच्या दिनांक १९ ऑक्टोबर  च्या आदेशान्वये याबाबतचे दोन दिवसीय प्रशिक्षण दिनांक २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनात सुरू झाले.

सर्व चार्ज अधिकारी तसेच त्यांचे कर्मचारी वर्ग यांना प्रशिक्षण देण्याकरिता जनगणना संचालनालयाचे श्री. प्रविण भगत सहाय्यक संचालक जनगणना संचालनालय तसेच श्री. नेहाल धुरंधरे एस.आय. ग्रेड २ जनगणना संचालनालय हे उपस्थित होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी जोगेंद्र कटयारे यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास एकूण ८५ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षण दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सुद्धा सुरू राहणार आहे. सदर प्रशिक्षणात सर्व चार्ज अधिकारी यांनी उत्साहाने सहभागी होऊन पथकास येणाऱ्या अडचणींचे निराकरण तज्ज्ञांकडून करून घेऊन आपल्या चार्जमधील प्राप्त होणारी माहिती निर्दोष व अचूक प्राप्त होईल असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी सर्व चार्ज अधिकारी व कर्मचारी यांना केले.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा