महाबीजच्या कार्याचा प्रत्येक बांधावर विस्तार करा – कृषी सचिव परिमल सिंह ; ई-कॉमर्स, डिजिटल विक्री आणि कृषी निविष्ठांबाबत जनजागृतीला प्राधान्य ; महाबीज मुख्यालयात कामकाजाचा सविस्तर आढावा
महाबीजच्या कार्याचा प्रत्येक बांधावर विस्तार करा
– कृषी सचिव परिमल सिंह
ई-कॉमर्स, डिजिटल विक्री आणि कृषी निविष्ठांबाबत जनजागृतीला प्राधान्य;
महाबीज मुख्यालयात कामकाजाचा सविस्तर आढावा
अकोला, दि. २७ : बदलत्या हवामानाच्या आव्हानात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांना अधिक अनुकूल, उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीमध्ये महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, महाबीजने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत आपल्या कार्याचा विस्तार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत करावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषी सचिव तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष परिमल सिंह यांनी केले.
अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, संचालक डॉ. रणजीत सपकाळ तसेच विविध विभागांचे महाव्यवस्थापक उपस्थित होते.
श्री.सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाबीजने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा. महाबीजद्वारे उत्पादित प्रमाणित व सुधारित बियाणे, जैविक खते, जैविक बुरशीनाशके तसेच सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त विविध कृषी निविष्ठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठा एका क्लिकवर उपलब्ध होतील, अशी सुलभ डिजिटल विक्री व्यवस्था विकसित करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाबीज हे गेल्या पाच दशकांपासून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून उत्पादनक्षम, दर्जेदार आणि सुधारित बियाण्यांचा पुरवठा करणारे महत्त्वपूर्ण महामंडळ म्हणून कार्यरत आहे. मात्र, बदलती हवामान परिस्थिती, शेतीचा वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील आव्हाने आणि शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेता महामंडळाने आधुनिकता, गतिमानता आणि शेतकरी-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांमध्ये कृषी निविष्ठांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करावी, असेही श्री सिंह यांनी यावेळी सांगितले.
पंचसूत्री उपक्रमासह विविध योजनांचा आढावा
या बैठकीत महाबीजच्या पंचसूत्री उपक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 'महाबीज प्रत्येक बांधावर' तसेच 'उत्सव नवरात्रीचा, प्रचार महाबीजचा' या उपक्रमांच्या माध्यमातून महामंडळाच्या योजनांचा आणि उत्पादनांचा शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रचार व प्रसार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
याशिवाय संवाद व समुपदेशन कार्यशाळा, महाबीजच्या कार्याचा विस्तार, बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे, विविध बियाणे महामंडळांशी सामंजस्य करार, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान तसेच महामंडळाच्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
00000


.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा