रोहयोतून चारा लागवड

रोहयोतून चारा लागवड

वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतासह करता येईल सामुदायिक जमिनीचाही वापर 

 अकोला, दि. १९ - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी हिरवा व कोरडा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासह चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी - विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) 'व्हीबी जी राम जी' योजनेंतर्गत चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. 

या निर्णयानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर तसेच सार्वजनिक व सामुदायिक जमिनीवर चारा लागवडीची कामे हाती घेता येणार असून, सात प्रकारच्या अतिरिक्त चारा पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.


सन २०२६ मध्ये पावसातील तूट, पावसाचे असमान वितरण, खरीप पिकांच्या उत्पादनात झालेली घट तसेच रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात संभाव्य घट यामुळे पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चारा उत्पादनात वाढ करून पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूणघास (ल्युसर्न), ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या चारा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकांच्या विविध सुधारित वाणांची लागवड करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयात नमूद चारा पिके आणि वैरणयुक्त वृक्षांच्या लागवडीसह आता या अतिरिक्त चारा पिकांची लागवडही अनुज्ञेय करण्यात आली आहे.


'व्हीबी जी राम जी' योजनेंतर्गत अनुज्ञेय ३७५ कामांमधील ‘उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा’ या वर्गात सामुदायिक उपयोगासाठी चारा लागवड आणि वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी चारा लागवड अशा दोन कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकरी तसेच सामुदायिक जमिनीवर चारा उत्पादनाची कामे घेणे शक्य होणार आहे. चारा लागवडीसाठी आवश्यक वाणांचे बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) आदी संस्थांकडून उपलब्ध करून घेता येणार आहेत. प्रामुख्याने कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि एकापेक्षा अधिक वेळा कापणी करता येणारी चारा पिके व त्यांचे वाण यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार, सिंचनाची शाश्वत उपलब्धता आणि पीक कालावधी विचारात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी योग्य वाणांची शिफारस करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.  


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा