भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीरांचे योगदान
विशेष लेख :
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीरांचे योगदान
भगवान बिरसा
मुंडा यांच्या जयंतीचे आणि जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून भारतीय
स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी वीर-वीरांगनांच्या शौर्याचे स्मरण करणे आणि त्यांच्या
पराक्रमाची सुवर्णगाथा जनमानसासमोर मांडणे, हा
या लेखाचा उद्देश आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजाने दिलेले योगदान, केलेला
त्याग आणि आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी उभारलेला संघर्ष हा भारतीय इतिहासातील एक
प्रेरणादायी अध्याय आहे.
“ज्यांच्या बलिदानाने जंगलांची माती पावन झाली, ज्यांच्या
धगधगत्या बाणांनी ब्रिटिश साम्राज्याच्या पायाला हादरे दिले आणि ज्यांच्या
हुंकाराने स्वातंत्र्यलढ्याला नवी प्रेरणा मिळाली, त्या
आदिवासी क्रांतिवीरांच्या असीम पराक्रमाची ही इतिहासाच्या पानांवर कोरलेली अमर
गाथा आहे!”
भारताच्या
स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ काही मोजक्या क्रांतिकारकांच्या संघर्षाचा
इतिहास नाही. या इतिहासात देशाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य ज्ञात-अज्ञात
वीर-वीरांगनांचे योगदान आहे. घनदाट जंगलांच्या कुशीत,
डोंगर-दऱ्यांच्या सान्निध्यात
आणि निसर्गाशी अतूट नाते जपत जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजानेही स्वातंत्र्यलढ्यात
महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जल, जंगल आणि
जमिनीवरील पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांनी उभारलेले संघर्ष भारतीय
इतिहासात विशेष महत्त्वाचे ठरले आहेत.
ब्रिटिश
सत्तेने आदिवासी समाजाच्या जंगल, जमीन
आणि पारंपरिक हक्कांवर निर्बंध घातले. त्यांच्या उपजीविकेच्या साधनांवर मर्यादा
आणल्या. अन्यायकारक महसूल व्यवस्था, सावकारांचे
शोषण आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला. या
अन्यायाविरुद्ध आदिवासी बांधवांनी संघटित होऊन संघर्ष उभारला. पारंपरिक धनुष्यबाण, तीरकामठे
आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीच्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी आधुनिक
शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या ब्रिटिश सैन्याला कडवा प्रतिकार केला. गनिमी
काव्याचा अवलंब करून अनेक आदिवासी क्रांतिवीरांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले.
आदिवासी
समाजाचा हा संघर्ष केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. त्यामध्ये
सामाजिक न्याय, सांस्कृतिक
अस्मिता, स्वाभिमान आणि पारंपरिक हक्कांच्या
संरक्षणाची प्रेरणाही होती. जनजातीय गौरव दिनानिमित्त या संघर्षातील काही प्रमुख
क्रांतिवीरांच्या कार्याचे स्मरण करणे आवश्यक आहे.
भगवान बिरसा मुंडा
झारखंडमधील
छोटानागपूर परिसरात जन्मलेले भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे
आणि संघर्षाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी ‘उलगुलान’ अर्थात
महाउठावाचा नारा देत ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले.
आदिवासींच्या जमिनीवरील पारंपरिक हक्कांचे संरक्षण, शोषणकारी
व्यवस्थेला विरोध आणि स्वशासनाची स्थापना ही त्यांच्या संघर्षाची प्रमुख उद्दिष्टे
होती.
ब्रिटिशांच्या
अन्यायकारक धोरणांविरुद्ध त्यांनी व्यापक जनजागृती केली. पारंपरिक धनुष्यबाणांच्या
साहाय्याने ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रास्त्रांना प्रतिकार केला. त्याचबरोबर
आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा
आणि सामाजिक अस्मिता जपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखालील
आंदोलनामुळे ब्रिटिश प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
आदिवासी
समाजात ‘धरती
आबा’ आणि ‘भगवान’ म्हणून
आदराचे स्थान मिळविणारे बिरसा मुंडा हे सामाजिक परिवर्तनाचेही प्रेरणास्थान ठरले.
ब्रिटिशांनी त्यांना अटक करून रांची येथील कारागृहात ठेवले. ९ जून १९०० रोजी
वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी कारागृहात त्यांचा मृत्यू झाला. अल्पायुष्यात त्यांनी
उभारलेला संघर्ष आदिवासी समाजाच्या शौर्याचे आणि स्वाभिमानाचे अमर प्रतीक ठरला.
सिदो
आणि कान्हू मुर्मू
सन १८५५-५६
मधील ऐतिहासिक संथाळ उठावात सिदो आणि कान्हू मुर्मू या वीरबंधूंनी महत्त्वपूर्ण
नेतृत्व केले. ब्रिटिशांचे अन्यायकारक कायदे, शोषणकारी
महसूल व्यवस्था,
जमीनदारांची दडपशाही आणि
सावकारांच्या जाचाविरुद्ध त्यांनी हजारो संथाळ आदिवासींना संघटित केले.
३० जून १८५५
रोजी सुरू झालेला ‘संथाळ
हूल’ हा ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण
आदिवासी उठावांपैकी एक होता. या संघर्षात आदिवासी बांधवांनी पारंपरिक शस्त्रांच्या
साहाय्याने ब्रिटिश सैन्याला कडवा प्रतिकार केला. अखेर ब्रिटिशांनी हा उठाव दडपला.
मात्र, सिदो आणि कान्हू मुर्मू यांच्या
नेतृत्वाखालील या संघर्षाने आदिवासी समाजात स्वातंत्र्य, स्वाभिमान
आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली.
तंट्या
भिल्ल
मध्य भारत
आणि खान्देशातील आदिवासी समाजाच्या संघर्षात तंट्या भिल्ल यांचे नाव आदराने घेतले
जाते. ‘तंट्या
मामा’ म्हणून ओळखले जाणारे हे क्रांतिवीर गोरगरिबांचे
कैवारी आणि ब्रिटिश सत्तेचे कडवे विरोधक होते. त्यांच्या धाडसी कारवायांमुळे
ब्रिटिश प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
ब्रिटिशांची
संपत्ती लुटून गरजूंमध्ये वाटणारे तंट्या भिल्ल हे ‘भारतीय रॉबिनहुड’ म्हणून
प्रसिद्ध झाले. गरिबांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. आदिवासी समाजाच्या
हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी मानला जातो.
त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिशविरोधी संघर्षाला नवी दिशा आणि बळ मिळाले.
अल्लुरी
सीताराम राजू
आंध्र
प्रदेशातील आदिवासी समाजाच्या ब्रिटिशविरोधी संघर्षात अल्लुरी सीताराम राजू यांचे
योगदान महत्त्वपूर्ण आहे. ब्रिटिशांच्या वनविषयक धोरणांमुळे आदिवासी समाजाच्या
पारंपरिक हक्कांवर निर्बंध आले होते. या अन्यायाविरुद्ध त्यांनी आदिवासी बांधवांना
संघटित केले.
सन १९२२ ते
१९२४ या कालावधीत त्यांनी ‘रम्पा
उठाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सशस्त्र आंदोलनाचे
नेतृत्व केले. गनिमी काव्याचा प्रभावी वापर करून त्यांनी ब्रिटिश सैन्याला आव्हान
दिले. आदिवासी समाजाच्या पारंपरिक हक्कांसाठी संघर्ष करणारे अल्लुरी सीताराम राजू
हे स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रेरणादायी नेतृत्व ठरले. त्यांच्या शौर्यामुळे
त्यांना ‘मन्यम वीरुडू’ अर्थात
जंगलाचा वीर म्हणूनही ओळखले
जाते.
आदिवासी
वीरांगणांचे शौर्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
भारतीय
इतिहासातील आदिवासी समाजाच्या संघर्षात पुरुषांबरोबरच महिलांनीही महत्त्वपूर्ण
योगदान दिले आहे. शौर्य, त्याग, स्वाभिमान
आणि नेतृत्वाचा आदर्श घालून देणाऱ्या अनेक आदिवासी वीरांगनांनी अन्यायकारक
सत्तेविरुद्ध संघर्ष केला. काहींनी प्रत्यक्ष रणांगणात शस्त्र हाती घेतले, तर
काहींनी क्रांतिकारकांना संघटित करून त्यांच्या लढ्याला बळ दिले.
वीरांगना
राणी दुर्गावती
गोंडवाना
साम्राज्याच्या राणी दुर्गावती या आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक शौर्यपरंपरेतील एक
महान वीरांगना म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा संघर्ष ब्रिटिश राजवटीपूर्वीचा असून,
सोळाव्या शतकात त्यांनी मुघल
सत्तेविरुद्ध आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी लढा दिला.
मुघल सम्राट
अकबराच्या कारकिर्दीत आसफ खानाच्या नेतृत्वाखालील सैन्याने गोंडवाना राज्यावर
आक्रमण केले. या आक्रमणाला राणी दुर्गावती यांनी अतुलनीय शौर्याने प्रतिकार केला.
शरणागती पत्करण्याऐवजी त्यांनी स्वाभिमानासाठी प्राणार्पण केले. त्यांचे बलिदान हे
स्वातंत्र्य, स्वाभिमान
आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या संघर्षाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
वीरांगना
राणी गाइदिन्ल्यू
मणिपूरमधील
रोंगमेई नागा समाजातील राणी गाइदिन्ल्यू या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान
आदिवासी वीरांगना होत्या. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी त्या हायपो जादोनांग
यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक, धार्मिक
आणि ब्रिटिशविरोधी चळवळीत सहभागी झाल्या.
सन १९३१
मध्ये ब्रिटिशांनी जादोनांग यांना फाशी दिल्यानंतर राणी गाइदिन्ल्यू यांनी या
आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. आदिवासी समाजाची संस्कृती,
पारंपरिक श्रद्धा आणि
स्वशासनाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. ‘हेराका’ चळवळीच्या
माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती केली आणि आदिवासी बांधवांना
संघटित केले.
ब्रिटिशांनी
सन १९३२ मध्ये त्यांना अटक करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देशाला स्वातंत्र्य
मिळाल्यानंतर सन १९४७ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांच्या शौर्याचा गौरव करताना
जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना ‘राणी’ म्हणून
संबोधले. राणी गाइदिन्ल्यू यांचे जीवन आदिवासी समाजातील महिलांच्या धैर्याचे, नेतृत्वाचे
आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
याशिवाय
संथाळ उठावातील फुलो आणि झानो या वीरांगनांचे योगदानही विशेष उल्लेखनीय आहे. गोंड,
भिल्ल आणि इतर आदिवासी समाजांतील
अनेक ज्ञात-अज्ञात महिलांनी ब्रिटिशविरोधी संघर्षात सहभाग घेतला. क्रांतिकारकांना
अन्न, आश्रय आणि आवश्यक मदत पुरविण्याबरोबरच अनेक
महिलांनी प्रत्यक्ष संघर्षातही योगदान दिले. या वीरांगनांच्या त्यागामुळे आदिवासी
समाजाच्या स्वातंत्र्यलढ्याला अधिक बळ मिळाले.
आदिवासी
बलिदानाचे स्मरण
भारतीय
स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहिला, तर
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान
दिल्याचे दिसून येते. या संघर्षात आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि
प्रेरणादायी आहे. अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी कोणत्याही व्यक्तिगत लाभाची
अपेक्षा न ठेवता आपल्या भूमीच्या, संस्कृतीच्या
आणि पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष केला.
ब्रिटिश
सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध लढताना त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. आधुनिक
शस्त्रास्त्रांचा अभाव, आर्थिक
अडचणी आणि ब्रिटिश सैन्याचे सामर्थ्य यांची पर्वा न करता आदिवासी बांधवांनी आपला
संघर्ष सुरू ठेवला. त्यांच्या या लढ्यातून स्वातंत्र्य, समानता, सामाजिक
न्याय आणि स्वाभिमानाची मूल्ये अधोरेखित झाली.
आज आपण
स्वातंत्र्याची मोकळी हवा अनुभवत आहोत. या स्वातंत्र्याच्या पायाभरणीत असंख्य
ज्ञात-अज्ञात वीर-वीरांगनांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा वाटा आहे. त्यांच्या
संघर्षाचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही आपली सामाजिक आणि राष्ट्रीय
जबाबदारी आहे.
भगवान बिरसा
मुंडा यांची जयंती आणि जनजातीय गौरव दिन हा केवळ त्यांच्या स्मृतींना अभिवादन
करण्याचा दिवस नाही, तर
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध
संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रसंग
आहे. त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन सामाजिक न्याय, एकता, समानता
आणि स्वाभिमानाची मूल्ये जपण्याचा संकल्प करण्याची ही वेळ आहे.
आदिवासी
क्रांतिवीरांनी आपल्या आयुष्याचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा दिली.
त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची ही अमर गाथा केवळ इतिहासाच्या पानांपुरती
मर्यादित न राहता प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम प्रेरणादायी ठरली पाहिजे.
भारतीय
स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व आदिवासी क्रांतिवीरांच्या आणि
वीरांगनांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
प्रिती
बोंद्रे (केळकर)
सहआयुक्त
तथा उपाध्यक्ष,
अनुसूचित
जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,
छत्रपती
संभाजीनगर-१

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा