चला साकारूया गड-दुर्गांची प्रतिकृती; ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा! गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न; ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची संधी
चला साकारूया गड-दुर्गांची प्रतिकृती;
‘अमृत दुर्गोत्सव २०२६’मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा!
गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न;
३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची संधी
अकोला, दि.२० : छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि गड-किल्ल्यांच्या गौरवशाली वारशाची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या सुट्टीत घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा सोसायटीच्या परिसरात गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याच्या पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देत या उपक्रमात राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्साहाने गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात. या परंपरेच्या माध्यमातून केवळ कलात्मकतेला वाव मिळत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, गनिमी काव्याचे युद्धतंत्र, स्वराज्याची संकल्पना आणि दुर्गसंवर्धनाचे महत्त्वही अधोरेखित होते. हाच ऐतिहासिक वारसा अधिक व्यापक स्वरूपात जतन करण्यासाठी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी आहे सहभागाची प्रक्रिया
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी स्वतः तयार केलेल्या गड-किल्ल्याच्या प्रतिकृतीचे छायाचित्र किंवा त्यासोबतचा सेल्फी काढून www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा. यासाठी नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदीचा प्रयत्न
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी नागरिकांनी साकारलेल्या गड-दुर्गांच्या प्रतिकृतींच्या छायाचित्रांची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ सांस्कृतिक उत्सव न राहता महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याची संधी ठरणार आहे.
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, तरुण, पालक, शिक्षक, विविध सामाजिक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि सर्व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. आपल्या कल्पकतेतून गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत शिवरायांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे. चला, आपल्या हातांनी स्वराज्याचा इतिहास साकारूया आणि ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या माध्यमातून शिवशौर्याचा जागर राज्यभर करूया!
००००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा