वगळलेल्या मतदारांना आणखी एक संधी गणना प्रपत्र भरण्याचे आवाहन

 

 

 

 

 वगळलेल्या मतदारांना आणखी एक संधी

 गणना प्रपत्र भरण्याचे आवाहन

अकोला, दि. १२ - विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. घरोघरी भेटीदरम्यान ज्या मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मयत किंवा दुबार या प्रवर्गात गेल्यामुळे प्रारुप यादीत येऊ शकली नाहीत, अशा मतदारांना भारत निवडणूक आयोगाने नाव नोंदणीसाठी आणखी एक विशेष संधी दिली आहे.  

गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या बाबी:

  • अर्ज उपलब्धता: संबंधित मतदारांची जुनी माहिती असलेले गणना प्रपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत  प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअॅप, ई-मेल आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करून दिले जातील. तसेच मतदार स्वतः संकेतस्थळावरून किंवा ईसीआयनेटच्या माध्यमातून आपला इपिक क्रमांक टाकून हे प्रपत्र डाउनलोड करून ऑनलाइन भरू शकतात.
  • स्थानिक रहिवाशांसाठी अट: जे मतदार आपल्या मूळ निवासस्थानापासून स्थलांतरित झालेले नाहीत, त्यांनी गणना प्रपत्रासोबत 'जोडपत्र-ब' जोडून यापूर्वी अर्ज का सादर करू शकले नाहीत याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे.  
  • स्थलांतरित मतदारांसाठी अट: जे मतदार इतरत्र स्थलांतरित झाले आहेत, त्यांनी गणना प्रपत्रासोबत 'जोडपत्र-क' मध्ये आपला नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन सध्याच्या ठिकाणच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा.
  • संपर्क मोहीम: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शेजारी, नातेवाईक किंवा गृहनिर्माण संस्थांच्या मदतीने अशा मतदारांशी संपर्क साधून त्यांना प्रक्रियेची माहिती देतील.  

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ASDD मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत नाव असलेल्या ज्या मतदारांनी प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव नोंदणीसाठी 'फॉर्म-६' भरलेला नाही, त्यांनी तात्काळ ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने गणना प्रपत्र भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ज्या मतदारांनी यापूर्वीच फॉर्म-६ भरला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही. तरी सर्व संबंधितांनी पूर्तता करून घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा