प्रतिजैविकांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा आरोग्य विभागाचे आवाहन जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह
प्रतिजैविकांचा वापर
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा
आरोग्य विभागाचे आवाहन
जागतिक प्रतिजैविक जागरूकता
सप्ताह
अकोला, दि. १९ : प्रतिजैविकांचा
(अँटीबायोटिक्स) अनावश्यक आणि चुकीचा वापर केल्यामुळे
सूक्ष्मजीवांमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होत असून, भविष्यात सामान्य संसर्गांवरही उपचार करणे कठीण होऊ शकते. ही गंभीर समस्या रोखण्यासाठी नागरिकांनी प्रतिजैविकांचा
वापर केवळ पात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जागतिक प्रतिजैविक जागरूकता
सप्ताह दरवर्षी १८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जातो. प्रतिजैविकांचा
जबाबदार वापर, औषधांचा अनावश्यक वापर टाळणे आणि
सूक्ष्मजीव प्रतिरोधाच्या वाढत्या धोक्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे असे त्याचे उद्दिष्ट आहे. यंदा ‘एक आरोग्य, एक कृती : आताच सूक्ष्मजीव प्रतिरोध रोखा’ अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
जिवाणू, विषाणू, बुरशी आणि
परजीवी यांच्यामध्ये कालांतराने बदल होऊन त्यांच्यावर उपचारासाठी वापरण्यात
येणाऱ्या औषधांचा परिणाम कमी होतो किंवा औषधे प्रभावी ठरत नाहीत. या स्थितीला
सूक्ष्मजीव प्रतिरोध असे म्हणतात. विशेषतः प्रतिजैविकांचा चुकीचा वापर केल्यामुळे
जिवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होण्यास चालना मिळते. त्यामुळे
न्यूमोनिया, मूत्रमार्गाचे संसर्ग तसेच इतर
जिवाणूजन्य आजारांवरील उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात.
सर्दी, फ्लू आणि बहुतांश विषाणूजन्य संसर्गांवर प्रतिजैविके
परिणामकारक ठरत नाहीत. केवळ ताप आला म्हणून किंवा सर्दी-खोकला झाला म्हणून
स्वतःहून अँटीबायोटिक्स घेणे चुकीचे आहे. प्रतिजैविके ही प्रामुख्याने जिवाणूजन्य
संसर्गांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे आजाराचे योग्य निदान करून
डॉक्टरांनी सांगितल्यास त्यांचा वापर करावा.
प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर
केल्यास भविष्यात औषधे निष्प्रभ ठरण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय पचनसंस्थेतील
उपयुक्त जिवाणूंचे संतुलन बिघडून जुलाब, मळमळ,
उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते. काही व्यक्तींना त्वचेवर पुरळ, खाज किंवा गंभीर ॲलर्जीची प्रतिक्रिया येऊ शकते. तसेच काही
विशिष्ट प्रतिजैविकांमुळे यकृत आणि मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता
असते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय प्रतिजैविकांचे सेवन करणे धोकादायक ठरू
शकते.
त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिजैविके खरेदी करू
नयेत किंवा स्वतःहून घेऊ नयेत. डॉक्टरांनी
सांगितलेला औषधांचा डोस आणि कालावधी तंतोतंत पाळावा. औषधांमध्ये कोणताही बदल किंवा
उपचार थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरात शिल्लक राहिलेली जुनी प्रतिजैविके पुन्हा वापरू नयेत
किंवा इतरांना देऊ नयेत. दुसऱ्या व्यक्तीला दिलेली औषधे स्वतःसाठी वापरू नयेत. संसर्ग
टाळण्यासाठी नियमित हात धुणे, स्वच्छता राखणे, सुरक्षित अन्न व पाणी वापरणे आणि आवश्यक लसीकरण वेळेवर करून
घ्यावे. पशुपालन आणि शेतीमध्येही प्रतिजैविकांचा वापर तज्ज्ञांच्या
मार्गदर्शनानुसार आणि आवश्यकतेनुसारच करावा.
मानव, प्राणी आणि पर्यावरणाचे आरोग्य परस्परांशी जोडलेले आहे.
त्यामुळे प्रतिजैविकांचा जबाबदार वापर ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक जबाबदारी आहे. आज घेतलेली योग्य काळजी
भविष्यातील पिढ्यांसाठी प्रभावी औषधांची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत करेल.
त्यामुळे प्रतिजैविकांचा वापर गरजेनुसार, योग्य निदानानंतर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग, अकोला यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा