विशेष लेख : शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात शासनाची साथ; मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी संकटाच्या काळात बळीराजाला विश्वासाचा आधार
विशेष लेख
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात शासनाची साथ; मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी
संकटाच्या काळात बळीराजाला विश्वासाचा आधार
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण. मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात चिंतेचे सावट आहे. शेतातील पिकांचे नुकसान, घटलेले उत्पादन आणि आर्थिक अडचणी अशा परिस्थितीत बळीराजाची दिवाळी गोड व्हावी, त्याच्या सुख-दुःखात शासन सहभागी आहे, हा विश्वास निर्माण व्हावा, या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्यांनी विविध गावांमध्ये जाऊन शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद वाटला. अकोला जिल्ह्यातही कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करून शासनाच्या संवेदनशील भूमिकेचे दर्शन घडविले.
केवळ शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणे आणि संकटाच्या काळात त्यांना मानसिक आधार देणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा विचार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी गोर्धा गावातील शेतकरी गजानन परनाटे यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ केला. गावातील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात शेतकरी बांधव आणि महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त शेतकरी व शेतमजूर महिलांना फराळ आणि साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष गावात येऊन आपल्यासोबत सण साजरा केल्याबद्दल शेतकरी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले.
मदतीचा हात आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा संकल्प
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेताना पालकमंत्र्यांनी राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, यासाठी केंद्र शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य शासनाने अग्रीम मदतीचे वितरण सुरू केले आहे. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणीही सुरू आहे.
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे गोसी खुर्द प्रकल्पातील पाणी अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे विदर्भातील कोरडवाहू भागाला सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
सणापुरता नव्हे, तर वर्षभर शेतकऱ्यांच्या पाठीशी
राज्यातील विविध भागांत मंत्र्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. अकोल्यातील गोर्धा गावातील उपक्रमही याच व्यापक प्रयत्नांचा भाग ठरला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमुक्ती, सिंचन सुविधा, आवास आणि महिला सक्षमीकरणाच्या योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शासनाने थेट संवादाचा मार्ग स्वीकारला आहे.
शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्याच्या घरातील आनंद आणि समाधान हे राज्याच्या विकासाशी जोडलेले आहे. त्यामुळे संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हा शासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा समृद्धीचे दिवस यावेत, यासाठी मदतीसोबतच कायमस्वरूपी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती ठरणार आहे.
हर्षवर्धन पवार,
जिल्हा माहिती अधिकारी,
अकोला
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा