अकोल्यात १८ नोव्हेंबरला रोजगार मेळावा सुशिक्षित युवक-युवतींना सुवर्णसंधी

 

अकोल्यात १८ नोव्हेंबरला रोजगार मेळावा
सुशिक्षित युवक-युवतींना सुवर्णसंधी

अकोला, दि. १३ : जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या व प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबरला विशेष रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला आणि मॉडेल करिअर सेंटर, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' पार पडणार आहे.  'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'अंतर्गत एकूण ४५ प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) पदांसाठी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यात दि अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला: ३० पदे व ओझोन हॉस्पिटल येथील १५ पदांचा समावेश आहे.   

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 'एम्प्लॉईमेंट' टॅबमधील 'जॉब सीकर' पर्याय निवडून आपल्या नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक व पासवर्डच्या साहाय्याने लॉगिन करावे. होम पेजवरील 'जॉब फेअर' पर्यायात अकोला जिल्हा निवडून १८ नोव्हेंबरच्या मेळाव्यासमोर आपल्या पात्रतेनुसार पदासाठी 'अप्लाय' करावे आणि रजिस्ट्रेशन स्लिपची प्रिंट काढावी.  

कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
ऑनलाईन नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी रजिस्ट्रेशन स्लिप, बायोडाटा (रिझ्युमे), पासपोर्ट आकाराचे फोटो आणि सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने प्रत्यक्ष उपस्थित राहावे. नोंदणीसंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयाच्या (०७२४) २४३३८४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा akolarojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल सु. शेळके यांनी केले आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा