पालकमंत्र्यांचे निर्देश; विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे विभागीय आयुक्तांना पत्र शेती नुकसान पंचनामे करण्यास मंजुरी मिळण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव पाठविला



अकोला, दि. १४ : जिल्ह्यात सततच्या पावसाने पिकांच्या वाढीवर परिणाम होणे,  सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन शेंगा न लागणे या बाबी पाहता नुकसानीच्या अनुषंगाने बाधित क्षेत्राचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.

सततच्या पावसाने शेती पिकाचे झालेले नुकसान पाहता आर्थिक मदत मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींची मागणी, पत्रे, निवेदने प्रशासनाला प्राप्त झाली. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तत्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. त्यानुसार याबाबत सर्वेक्षण व पंचनामे करण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांच्याकडे पाठवला आहे.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून शेती नुकसानीचा संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त आहे. त्यानुसार एक लाख 89 हजार 346 हे. आर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत जून महिन्यात 101.8 टक्के, जुलै महिन्यात 141.7 टक्के, ऑगस्ट महिन्यात 93,1 टक्के आणि दि. एक ते 13 सप्टेंबर दरम्यान 88.7 टक्के पाऊस झाला. शासन निर्णयानुसार सलग पाच दिवस किमान 10 मिमी पाऊस झाला नसला तरी सतत पाऊस सुरू असल्याने पिकांच्या फुल व फळधारणेवर परिणाम झाला.
त्यामुळे पिकांची वाढ न होणे,  सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन शेंगा न लागणे आदी नुकसान झाले. या  अनुषंगाने बाधित क्षेत्राचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी, असे प्रस्तावात नमूद आहे.
०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज