जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम लोकचळवळ व्हावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा 

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम लोकचळवळ व्हावा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. 13 : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत आहे. हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

अभियानाच्या अंमलबजावणी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिका-यांची ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, पंधरवड्यासाठी ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही थीम निश्चित करण्यात आली आहे. नियमित स्वच्छता न होणा-या स्थळांचे कायमस्वरूपी स्वच्छ व सुंदर स्थळात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे. अशी ठिकाणे निवडणे, स्वच्छता, कच-याची शास्त्रोक्त विल्हेवाट, पर्यटनस्थळी शून्य कचरा कार्यक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमेत अधिकाधिक सहभाग मिळवणे आदी कामे नियोजनपूर्वक पार पाडावीत. स्वच्छतेबाबत जनजागृती आणि स्वच्छतेचा संस्कृती म्हणून अंगीकार यासाठी प्रयत्न व्हावेत.

 

ते पुढे म्हणाले की,  सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिर घेऊन त्यांना सर्व शासकीय योजनांचा एक खिडकीद्वारे लाभ देणे हा मोहिमेचा उद्देश आहे. सफाईमित्रांना घर, पाणी, स्वच्छतागृह, वीज, बँकिंग, एलपीजी, विमा, लसीकरण, कर्ज सुविधा आदींसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.आवास योजना, अमृत जल योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, हर घर बिजली, पीएम जनधन, उज्ज्वला योजना, जनआरोग्य, आयुष्मान भारत, मिशन इंद्रधनुष्य, पीएम सुरक्षा व जीवनज्योती योजना अशा विविध योजनांचा लाभ सफाई मित्रांना व्हावा यासाठी शिबिरे आयोजित करावीत. त्यांना पीपीई कीट, सुरक्षा साधने पुरवावीत.

मोहिमेत शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आदींशी समन्वय साधून अधिकाधिक लोकसहभाग मिळावा व ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन श्री. कुंभार यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज