माझी माती, माझा देश अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना



 

माझी माती, माझा देश

अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना

 

अकोला, दि. 25 : ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात जिल्ह्यातील विविध तालुके, शहरे, गावे येथून अमृतकलशात गोळा केलेली माती घेऊन जिल्ह्यातून 18 स्वयंसेवक आज रवाना झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते अमृत कलश स्वयंसेवकांना सुपुर्द करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिनारायणसिंह परिहार, अभियानाचे जिल्हा समन्वयक रोहिदास भोयर, जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेश शेखावत आदी यावेळी उपस्थित होते.

 

‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था, नेहरू युवा केंद्र व विविध सामाजिक संस्थांच्या सहभागासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अमृत कलश यात्रा व विविध देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले. विविध तालुक्यांतून मृदा गोळा करून कलश जिल्हास्तरावर आणण्यात आले.  

जिल्ह्याचे हे कलश जिल्हाधिका-यांनी स्वयंसेवकांना सुपुर्द केले. यावेळी विविध घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व स्वयंसेवकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. आता स्वयंसेवक मुंबईकडे रवाना झाले असून, तिथे राज्यातील विविध जिल्ह्यांतून कलश घेऊन स्वयंसेवक एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आझाद मैदानावर दि. 27 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सर्व कलश मुंबईमार्गे दिल्लीसाठी रवाना होतील.

 

            देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येणार आहेत. दि. 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या ‘अमृतवाटिके’त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल.

००० 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ