प्राप्त अर्जांचा विहित वेळेत निपटारा करावा - लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. एन. रामबाबू
प्राप्त अर्जांचा विहित वेळेत
निपटारा करावा
-
लोकसेवा हक्क
आयुक्त डॉ. एन. रामबाबू
अकोला, दि. 26 : सर्व कार्यालयांनी
विविध सेवांसाठी प्राप्त अर्जांचा विहित वेळेत निपटारा करावा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क
अधिनियमानुसार काटेकोर कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त
डॉ. एन. रामबाबू यांनी आज येथे दिले.
लोकसेवा हक्क आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हास्तरीय आढावा बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित
कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी,
आयोगाचे उपसचिव अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी यावेळी उपस्थित
होते.
आयुक्त डॉ. रामबाबू म्हणाले की,
आयोगाकडून 55 विभागांतील 478 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर
212 ऑनलाईन व 125 ऑफलाईन अशा 337 सेवा पुरविण्यात येतात. पात्र व्यक्तींना पारदर्शक,
कार्यक्षम लोकसेवा विहित वेळेत देणे आवश्यक आहे. अनेक कार्यालयांकडून अर्जांचा निपटारा
विहित वेळेत होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कामात तत्काळ सुधारणा करावी. याबाबत
प्रत्येक कार्यालयात जाऊन स्वतंत्र तपासणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक कार्यालयाने प्राप्त
अर्ज कालमर्यादेत निकाली काढून नागरिकांना चांगली सेवा मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न
करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा