जिल्ह्यातील वाळू डेपो महिनाभरात सुरू करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील



अकोला, दि. 16 : अवैध वाळू विक्रीला कठोरपणे पायबंद घालावा. नव्या वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच जिल्ह्यातील वाळू डेपो एक महिन्याच्या मुदतीत सुरू करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

 
पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी महसूल व विविध विभागांच्या कामांचा आढावा नियोजनभवनात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात कुठेही गौण खनिजाचा काळा बाजार होता कामा नये. अवैध वाळू तस्करी होत असेल तर ती तत्काळ मोडून काढावी. नव्या वाळू धोरणानुसार अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी. एका महिन्यात डेपो सुरू करण्यात यावेत. याप्रकरणी हयगय झाल्यास कारवाई करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला.
 ते पुढे म्हणाले की, जमीन मोजणीच्या  प्रलंबित 2 हजार 700 प्रकरणांचा नोव्हेंबरअखेर निपटारा करावा. विविध विभागांकडून राबविण्यात येणा-या विकासकामांची माहिती देणारे फलक त्याठिकाणी लावावेत. नागरिकांना विकासकामांची माहिती मिळण्यासाठी तहसील कार्यालय, ग्रामपंचायत अशा ठिकाणी डिजीटल बोर्ड लावावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. पांदणरस्ते अतिक्रमणमुक्त करणे, सलोखा योजना आदी विविध बाबींचा आढावाही त्यांनी घेतला.
सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा
अकोला शहरात कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापित करून शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यासाठी, तसेच इतरही नगरपरिषद क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.  
श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रारूप आराखड्यासाठी 50 लक्ष रू.
 श्री राजराजेश्वर मंदिराचा विकास, भाविकांसाठी सोयी-सुविधांच्या अनुषंगाने प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी 50 लक्ष रू. निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला. त्याचप्रमामे, काटेपूर्णा प्रकल्पस्थळी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन आराखडा करून विकासकामांना चालना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकांनंतर पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.  
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ