मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि. 20 : मध केंद्र योजनेत प्रशिक्षण व साहित्य अनुदानासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिका-यांनी केले आहे.
यंदा अकोला जिल्ह्यात सुमारे 16 लक्ष रू. निधीतून मध केंद्र योजना राबविण्यात येणार आहे. योजनेत मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान मिळते. त्यात 50 टक्के स्वगुंतवणूक करावी लागते. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी केली जाते. विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करण्यात येते.
वैयक्तिक मधपाळ या घटकात पात्र व्यक्तीला 10 मधपेट्या दिल्या जातात. अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ या घटकात वय 21 वर्षे व किमान 10 वी पास व्यक्तीला लाभ दिला जातो. व्यक्तीच्या नावे किमान किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्रचालक संस्था या घटकात संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवा असावी. केंद्रचालकास 50 मधपेट्या (4 हजार 200 रू. प्रमाणे) 50 टक्के अनुदानावर घेण्यासाठी 50 टक्के रक्कम कार्यालयास प्रथम जमा करणे व मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. वानखेडे , महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अकोला - 7774013809 8698057013, महसुल कॉलनी, शासकीय आय टी आय अकोला दुरध्वनी क्र. 0724- 2414250 येथे संपर्क साधावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा