अकोला जिल्ह्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 9 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे लोकार्पण








 
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे 

                                 पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

 

अकोला जिल्ह्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत

9 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे लोकार्पण

 

अकोला, दि. 19 : राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 9 केंद्रांचे लोकार्पण झाले.

 

अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू (अकोला), मुंडगाव (अकोट),  चोहट्टा (अकोट), वाडेगाव  (बाळापूर), माळेगाव बाजार (तेल्हारा), हिवरखेड (तेल्हारा), हातगाव ( मूर्तिजापूर), पिंजर महान (बार्शिटाकळी), आलेगाव (पातूर) आदी ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ झाला. 

 

जिल्ह्यातील 9 केंद्रांच्या ठिकाणी जिल्ह्यातील विविध मान्यवर व मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित केले. त्याचे थेट प्रक्षेपण केंद्रांच्या ठिकाणी करण्यात आले.   कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

बोरगाव मंजू येथील कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, जिल्हा व्यवसाय  प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंडगाव येथील कार्यक्रमाला आमदार प्रकाश भारसाकळे व इतर मान्यवर उपस्थित होते.  मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथील कार्यक्रमाला आमदार हरिश पिंपळे व अनेक मान्यवर उपस्थित होते. आलेगाव येथील कार्यक्रमाला आमदार वसंत खंडेलवाल व अनेक मान्यवर उपस्थित होते. चोहट्टा येथील कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयातही कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., माजी महापौर विजय अग्रवाल, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी द. ल. ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

 

 ग्रामीण भाग बनेल रोजगारनिर्मितीचे केंद्र

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रातील युवक युवतींच्या कौशल्य विकासासाठी व त्यांच्यातून उद्योजक निर्माण होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराची गरज पडू नये व स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रथम टप्प्यात 511 केंद्रांची निर्मीती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भाग हा रोजगारनिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले