मतदार नोंदणी व तपशील दुरूस्तीसाठी नोव्हेंबरमध्ये 4 विशेष शिबिरे जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण

 

 

मतदार नोंदणी व तपशील दुरूस्तीसाठी

नोव्हेंबरमध्ये 4 विशेष शिबिरे

जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण

 

अकोला, दि. 20 : जिल्हा निवडणूक यंत्रणेतर्फे छायाचित्र मतदार याद्यांच्या सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात प्रारूप याद्या ‘एसडीओ’, तहसील व ‘बीएलओ’ स्तरावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या याद्यांतील मतदाराच्या तपशीलात दुरूस्ती करणे, तसेच नोंदणी करणे यासाठी नोव्हेंबर महिन्यात सर्व मतदान केंद्रांवर चार विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

सर्वसाधारण मतदार नोंदणी व तपशील दुरुस्तीसाठी नोव्हेंबरमधील दि. 4 व दि. 5, तसेच दि. 25 व दि. 26 या चार दिवशी शिबिरे होतील. नवमतदारांनी मतदारयादीत नाव नोंदणी करावी, तसेच नाव, स्थलांतर, मयत आदी तपशीलाबाबत दुरूस्ती असल्यास करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दिवसभर केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदार याद्याची प्रारूप प्रसिद्धी शुक्रवारी (27 ऑक्टोबर) करण्यात येणार आहे. याद्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) व सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालयांबरोबरच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे (बीएलओ) उपलब्ध असतील. प्रारूप यादीवर दि. 27 ऑक्टोबर ते दि. 9 डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. मतदारांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत व त्यातील तपशील योग्य असल्याबाबत खात्री करावी.

ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा पात्र मतदारांनी आपले नाव नोंदविण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी, तहसील कार्यालये किंवा बीएलओ यांच्याकडे आवश्यक पुराव्यांसह विहित नमुना 6 सादर करावा. भारत निवडणूक आयोगाचे voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा ‘व्होटर हेल्पलाईन’ या ॲप्लिकेशनचाही ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापर करता येतो.

मयत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे वगळणी करण्यासाठी विहित नमुना 7 भरून द्यावा. मतदार यादीमधील तपशीलामध्ये दुरूस्ती करणे, पत्ता बदलणे, नवीन मतदार छायाचित्र मिळविणे आदींसाठी आवश्यक पुराव्यांसह विहित नमुना 8 मध्ये अर्ज सादर करावा. मतदार यादीत समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांनी त्यांच्या मतदार यादीमधील नोंदीशी आधार क्रमांक संलग्न करून प्रमाणीकरण केले नाही, त्यांनी विहित नमुना क्र. 6 ब भरून दि. 9 डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले.

दिव्यांगांसाठी सक्षम ॲप

दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपद्वारे नोंदणी करता येईल. तशी नोंदणी झाल्यास दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्यासाठी मदत होते. वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या पात्र नवमतदारांनी नोंदणी करावी व आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ