आयुष्मान कार्ड काढणे आता अधिक सोपे; करा ॲपचा वापर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत पाच लाख रू. पर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ - जिल्हाधिकारी अजित कुंभार


 आयुष्मान कार्ड काढणे आता अधिक सोपे; करा ॲपचा वापर

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत पाच लाख रू. पर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 27 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत गरजूंना पाच लाख रू. पर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ मिळतो. जिल्ह्यात आरोग्य केंद्रे, सामाईक सुविधा केंद्रांच्या ठिकाणी आयुष्मान कार्ड वितरित करण्यात येत आहेत. ॲपच्या साह्याने हे कार्ड स्वत:ही काढणे शक्य असून, अधिकाधिक नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

          केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसह राबवली जात आहे. या योजनेत 1 हजार 359 गंभीर आजारांवर पाच लक्ष रु. पर्यंतची शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः विनामूल्य केले जातात. आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब, प्रति वर्ष पाच लक्ष रुपये अशा स्वरूपात मिळते.

जिल्ह्यातील 3 लक्ष 40 हजार 834 पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असून, पात्र नागरिकांनी आपले कार्ड त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.  

'आयुष्मान भव' या मोहिमेत 'आयुष्मान आपल्या दारी' उपक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे. आशासेविका, ग्रामपंचायत केंद्रचालक, सेतू सुविधा केंद्र, आरोग्य यंत्रणा आणि अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र लाभार्थीच्या आधार कार्डच्या सहाय्याने आयुष्मान कार्ड तयार करून देत आहेत. त्याचप्रमाणे, मोबाईल ॲप्लिकेशनद्वारेही स्वत:च कार्ड काढता येते. 

कार्ड कसे काढावे?

गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्मान ॲप इन्स्टॉल करावे किंवा https://beneficiary.nha.gov.in ला भेट द्यावी.  युजर लॉगिन तयार करण्यासाठी मोबाईल नंबर टाईप करून त्यानंतर मिळालेला ओटीपी टाकावा. सर्च पर्यायाद्वारे नाव, आधार क्रमांक व शिधापत्रिका ऑनलाईन आयडीच्या आधारे पात्रता तपासावी. पात्र असल्यास मोबाईल ओटीपी, फिंगर, फेस ऑथच्या (मोबाईलद्वारे फोटो) माध्यमातून पडताळणी पूर्ण करता येते, अशी माहिती योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. अश्विनी खडसे यांनी दिली. टोल फ्री क्रमांक 14555 किंवा 1800111565 वर कॉल करावा.

           

अकोला जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 21 अंगीकृत रुग्णालये आहेत. त्यात अकोला येथील सिटी हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल, मुरारका हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल, न्यू ग्लोबल हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, संत तुकाराम हॉस्पिटल, श्रीमती बी. एल. चांडक हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, शुक्ला चिल्ड्रेन हॉस्पिटल, सन्मित्र मानस व्यसनमुक्ती केंद्र, फातेमा नर्सिंग होम हुसैनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मूर्तिजापूर येथे उपजिल्हा रूग्णालय, अवघाते बाल रूग्णालय, बाबन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आधार चॅरिटेबल हॉस्पिटल, मेहेर ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, समर्पण हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.  

 

******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ