बेलखेडमध्ये कॉल-याचे रूग्ण; तत्काळ औषधोपचार सुरू घरोघरी सर्वेक्षण करा; आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. 1 : तेल्हारा तालुक्यातील मौजे बेलखेड येथे गावातील नागरिकांना कॉलरा रोगाची लागण झाली असून, रूग्णांवर तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांकडून माहिती मिळताच जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तातडीने व्हीसीद्वारे विविध यंत्रणांची बैठक घेतली व आवश्यक औषधोपचार, तसेच घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.  
 आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वित
आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासणी अहवालानुसार बेलखेडमध्ये दुषित पाण्यामुळे सदर आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर आजाराच्या प्राथमिक लक्षणानुसार गावातील नागरिकांना अतिसार व उलट्या होत असून त्यानुसार प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार देण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर आजाराच्या अनुषंगाने बेलखेड गावामध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यात शहरे व गाव स्तरावर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, यासाठी महानगरपालिका, सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींनी  आवश्यक कार्यवाही करावी. ग्राम स्तरावर सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी तातडीने गुडमॉर्निंग पथके गठित करावी. गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी ही कार्यवाही तत्काळ करावी, असे आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.  
हा आजार दुषित पाण्यामुळे उद्भवत असल्याने नागरिकांनी पाणी उकळून थंड करुन पिण्यासाठी वापरावे तसेच घरातील लहान मुले, महीला, वृध्द नागरिक यांची विशेष काळजी घ्यावी. सदर आजाराच्या अनुषंगाने नागरीकांना काही त्रास जाणवल्यास तात्काळ स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुणालय, ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय तथा सर्वोपचार रुग्णालय आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. सदर आजाराच्या अनुषंगाने बेलखेड येथे आयसोलेशन वार्ड कार्यान्वित आहे, तसेच ग्रामीण रुग्णालय तेल्हारा आवश्यक खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बेलखेड व ग्रामिण रुग्णालय तेल्हारा येथे पुरेशे मनुष्यबळ, आवश्यक औषध साठा, बेड, अॅम्ब्युलन्स, तज्ज्ञ डॉक्टराचे पथक उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच बेलखेड गावामध्ये घरोघरी आरोग्य विषयक सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सदर आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.
 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज