आधार नोंदणी अर्जावरून हरवलेल्या बालिकेच्या कुटुंबाचा शोध बालकल्याण समितीची कामगिरी

 

आधार नोंदणी अर्जावरून हरवलेल्या बालिकेच्या कुटुंबाचा शोध

बालकल्याण समितीची कामगिरी

अकोला, दि. 5 : गुजरातेतून हरवलेल्या एका बालिकेच्या कुटुंबाचा शोध  तिच्या नावे आधारकार्डासाठी केलेल्या अर्जामुळे शक्य झाला. आता तिला तिच्या भरूच जिल्ह्यात सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.

 

याबाबत हकीकत अशी की, हरवलेल्या एका 16 वर्षांच्या बालिकेला खानदेशातील जळगाव या शहरातील बालगृहात दाखल करण्यात आले होते. त्या बालिकेने आपल्या गावाचे नाव लखनवाडा सांगितले. असे नामसाधर्म्य असलेले गाव अकोला जिल्ह्यात असल्यामुळे जळगाव जिल्हा बालकल्याण समितीने त्या बालिकेला अकोला येथील बाल कल्याण समितीकडे स्थलांतरित केले.

अकोला येथील बाल कल्याण समितीच्या आदेशाने ही बालिका गायत्री बालिकाश्रम येथे दाखल झाली. तिथे समुपदेशिका भाग्यश्री घाटे यांनी वारंवार तिचे समुपदेशन केले व तिची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काहीही सांगत नव्हती.

तिने सांगितलेल्या लखनवाडा या गावावरून लाखनवाडा गावात त्या बालिकेच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. मात्र, तसे कोणी मिळाले नाही. दरम्यान, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर यांनी गायत्री बालिकाश्रम येथे भेट दिली असता त्या बालिकेशी संवाद साधला. त्यांनी यावेळी आपले आधारकार्ड बालिकेला दाखविले. त्यावर तिने तत्काळ ‘मेरा भी ऐसा आधारकार्ड है’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे तिचे कुटुंब मिळण्याची आशा निर्माण झाली.

 

त्यानंतर या बालिकेच्या नावे आधार कार्ड नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला. मात्र, तो अर्ज ‘रिजेक्ट’ झाल्याचा संदेश 15 दिवसांनी प्राप्त झाला. त्यानुसार श्री. लाडुलकर यांनी आधार नोंदणी ग्राहक सेवा प्रतिनिधींशी संपर्क केला. तिथे त्यांना या बालिकेचे आधीच आधारकार्ड असल्यामुळे हा अर्ज नाकारल्याचे कळले. त्यानंतर श्री. लाडुलकर यांनी या बालिकेचा पत्ता देण्याची विनंती केली. मात्र, नियमानुसार असा पत्ता देणे शक्य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मुलीच्या नावे आधी केलेल्या अर्जाचा केवळ जुना नोंदणी क्रमांक मिळू शकला. तो क्रमांक घेऊन श्री. लाडुलकर यांनी मुंबईच्या ‘युडीआयडी’ कार्यालयाशी संपर्क साधला. तिथेही पत्ता मिळू शकला नाही मात्र, आधार क्रमांक मिळाला. 

 

त्यानंतर त्या बालिकेला आधार केंद्रावर नेण्यात आले व त्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक जोडण्यात आला. पाच दिवसानंतर नंबर जोडला गेला. त्या नंबरवर ओटीपी मिळवून बालिकेचे आधारकार्ड डाऊनलोड करण्यात आले.  त्यावर बालिकेचा पत्ता मिळाला. ती गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील असल्याचे कळले. नंतर भरूचच्या जिल्हा बालसंरक्षण कक्षासोबत संपर्क करण्यात आला. तिथून त्या बालिकेचे पालक येण्यास सक्षम नसल्याचे व बालिकेला तिच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी पोलीस पथक मिळत नसल्याचा संदेश मिळाला. मग श्री. लाडुलकर यांनी अकोला जिल्हा पथक तिच्यासोबत पाठवले व प्रवासखर्चही स्वत: दिला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, चाईल्ड लाईनचे रोहित भाकरे, विद्या उंबरकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. हर्षाली गजभिये, वैशाली भारसाकळे, आधार जिल्हा व्यवस्थापक प्रमोद ठाकुर, नितेश शिरसाट, बालकल्याण समिती, चाईल्डलाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सहकार्य लाभले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ