शेवटच्या 48 तासांतील कार्यवाहीबाबत उमेदवारांना सूचना

 शेवटच्या 48 तासांतील कार्यवाहीबाबत उमेदवारांना सूचना

अकोला, दि. 24 : लोकसभा निवडणूकीत मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तासांआधी प्रचार थांबणार आहे.  मतदानाआधीचा व मतदानाच्या दिवशी घ्यावयाच्या दक्षतेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडून उमेदवारांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत.  

त्यानुसार, कोणतीही व्यक्ती मतदान संपण्याच्या निश्चित वेळेच्या 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीसंबंधित कोणतीही सार्वजनिक सभा, मिरवणूका घेता येणार नाही. चलचित्रक, दूरदर्शन, तत्सम उपकरणाद्वारे, वाहनावर ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती प्रदर्शित किंवा प्रचार करता येणार नाही. मतदान समाप्तीच्या वेळेपूर्वी 48 तासांच्या अवधीत राजकीय स्वरूपाचे एकत्रित एसएमएस पाठविण्यास बंदी आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदार अनुक्रमांक, केंद्र आदी अनौपचारिक ओळखचिट्ठ्या मतदारांना देता येतील. अशा ओळखचिठ्ठी पांढ-या कागदावर असाव्यात. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह असता कामा नये. मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत असे चिठ्ठीवाटप करता येणार नाही.

मतदान केंद्रावर निर्बंध लागू

मतदान केंद्रावर किंवा तिथून 100 मीटरच्या आत मते मिळविण्यासाठी प्रचार, मतदाराकडे मताची अभियाचना करणे, कोणतीही खूण, चिन्ह प्रदर्शित करणे यावर बंदी आहे. या परिसरात ध्वनीक्षेपक वापरणे, आरडाओरडा करणे आदींना बंदी आहे.  मतदान केंद्राजवळ उमेदवारांना मंडप उभारता येणार नाही. उमेदवारांना अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या वाटण्यासाठी 200 मीटर अंतरापलीकडे एक टेबल, दोन खुर्च्या आदींसह सावलीसाठी छत्री, ताडपत्री कापड अशी सोय करून बसता येईल. मात्र, अशा टेबलांजवळ गर्दी होता कामा नये.

मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहन वापरणे हा अपराध आहे. मतदान प्रतिनिधीने मतदान सुरू होण्याच्या किमान 90 मिनीटे आधी पोहोचणे आवश्यक आहे.

मतदान केंद्राच्या आत कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्रात किंवा त्यापासून शंभर मीटर अंतराच्या आत निवडणूक लढवणा-या प्रचार करण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्षाचे नाव असलेले बिल्ले, चिन्हे, घोषणा, तशी चिन्हे असलेली टोपी, शाल आदी कपडे वापरता येणार नाहीत.  तथापि, निवडणूक प्रतिनिधीला त्याची ओळख पटण्यासाठी तो ज्या उमेदवाराचा प्रतिनिधी आहे त्याचा बिल्ला लावता येईल.

००० 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ